Headlines

मृत्यूनंतर पुन्हा कबरीबाहेर आली फाजिला:पोलिसांनी बॉडी बाहेर काढून केला पोस्टमार्टेम; मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे गळा आवळून झाल्याचे स्पष्ट




पोलिसांनी कबरीतून काढून फाजिला शेख नामक एका नवविवाहितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर विवाहितेचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा दावा करत तिच्या सासरच्यांनी तिचा दफनविधी उरकला होता. पण माहेरच्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी तिचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन केले असता फाजिलाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. लग्नानंतर प्रत्येक नवविवाहित मुलगी आपल्या आयुष्याबद्दल सुंदर स्वप्ने पाहत असते. फाजिला शेखनेही प्रेम, विश्वास आणि आनंदाने भरलेल्या संसाराची स्वप्ने रंगवली होती. सुरुवातीचे काही दिवस तिचे आयुष्य खूप आनंदात गेले. नवऱ्याचे प्रेम, सासरच्यांचे आपुलकीचे वागणे यामुळे ती समाधानी होती. मात्र कालांतराने परिस्थिती बदलू लागली. तिचा नवरा आणि सासरच्या इतर लोकांच्या वागण्यात कठोरपणा येऊ लागला. छोट्या-छोट्या कारणांवरून तिला टोमणे मारले जाऊ लागले. अखेर हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. ज्या घराला तिने आपल्या सुखी संसाराचे स्वप्न मानले होते, तेच घर तिच्यासाठी दुःख आणि वेदनेचे कारण बनले. अखेर त्याचे रुपांतर तिच्या हत्येत झाले. काय घडली नेमकी घटना? यासंबंधीच्या माहितीनुसार, अमरावती येथील फाजिला शेख हीचा विवाह गत जानेवारी महिन्यात नागपूरच्या बोरियापूर परिसरातील जुबेर शेख याच्यासोबत झाला होता. सुरूवातीला सर्वकाही ठिकठाक होते. पण नंतर काही दिवसांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. तिला मारहाण व मानसिक त्रास सुरू झाला. पीडित कुटुंबाच्या माहितीनुसार, फाजिलाने 14 मे रोजी आईला फोन करून रडत ‘मला वाचवा, माझ्यासोबत काहीही होऊ शकते’ असे सांगितले होते. त्यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिच्या माहेरच्यांना फाजिलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. सासरच्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा दावा फाजिलाच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या माहेरचे लोक तातडीने नागपुरात पोहोचले. सुरुवातीला तिच्या सासरच्या लोकांनी तिचा मृतदेह देण्यास नकार दिला. नंतर तो मृतदेह अमरावतीला नेण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान घालताना फाजिलाच्या गळ्यावर जखमेच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे तिची हत्या झाल्याचा संशय अधिक गडद झाला. पण नंतर घाईघाईने तिचा दफनविधी उरकण्यात आला. हा सर्व प्रकार फाजिलाचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन याला संशयास्पद वाटला. त्यामुळे त्याने तत्काळ पोलिसांत फाजिलाच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोस्टमार्टेममध्ये गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट फाजिलाच्या भावाच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी फाजिलाचा मृतदेह कबरीतून बाहेर काढून त्याचे शवविच्छेदन केले. त्याच्या प्राथमिक अहवालात फाजिलाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याची पुष्टी झाली. त्या आधारावर नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्यात कलम 103, 238, 351 (2) व 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात फाजिलाचा पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान, सासरा जलील शेख यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी पती व दीराला ताब्यात घेऊन कोर्टापुढे हजर केले. तर सासऱ्यांना वृद्धापकाळामुळे अद्याप अटक करण्यात आली नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *