![]()
मेळघाटच्या समृद्ध वनसंपदेवर घाला घालणाऱ्या प्रस्तावित १५०० मेगावॅट क्षमतेच्या ‘पंप्ड स्टोरेज’ या जलविद्युत प्रकल्पासाठी मेळघाटच्या घनदाट अरण्यामधील २४० हेक्टर जमीन देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. त्यासाठी तेथे खोदकाम (ड्रीलींग) सुरु झाले असून ते सुमारे ३ महिने चालणार आहे. त्यातून काढले जाणारे दगड थेट दिल्ली येथे परीक्षणासाठी पाठवले जात आहेत. विशेष असे की २३ वर्षांपूर्वी पर्यावरणीय कारणांमुळे हाच प्रकल्प नाकारण्यात आला होता. परंतु एका समूहाचे नाव पुढे येताच तो मंजुरीच्या मार्गावर कसा पोहोचला, असा रोकडा सवाल विचारत माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी २००३ च्या लोकसभेतील उत्तराचा दाखला दिला आहे. त्यातील कागदपत्रे दाखवत भारत सरकारच्या पर्यावरण आणि वन मंत्रालयाने लोकसभेत (अतारांकित प्रश्न क्रमांक ५९७६, उत्तर दिनांक ०५.०५.२००३) दिलेल्या उत्तराचा संदर्भही दिला आहे. तत्कालीन सदस्य मोहन रावळे यांनी चिखलदरा पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी संबंधितांनी मागितलेल्या ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) काय झाले, असा प्रश्न लोकसभेत विचारला होता. तेव्हा तत्कालीन पर्यावरण व वन राज्यमंत्री दिलीपसिंह जू देव यांनी समृद्ध वनस्पती व प्राणीसंपत्ती तसेच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या निकटतेमुळे हा प्रस्ताव स्वीकारार्ह नसल्याचे स्पष्ट केले होते. मग आता कशी काय मंजुरी दिली गेली, असे माजी पालकमंत्री डॉ. देशमुख यांनी विचारले आहे. तर जाहीर माफी मागून राजकारण सोडून देईल ^मी स्वतः राज्याच्या जलसंपदा खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्यामुळे अशा मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचे स्वरूप, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष रोजगारनिर्मितीची व्याप्ती याची मला चांगली माहिती आहे. इतके कायमस्वरूपी रोजगार जर या प्रकल्पातून निर्माण होत असतील तर मी माफी मागून राजकारण सोडून देईल – डॉ. सुनील देशमुख, माजी पालकमंत्री. वन्यजीवांचा अधिवास धोक्यात ^विकासाच्या नावावर जमिनी ताब्यात घेऊन वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट करण्याचा हा प्रकार असून, यातून संविधानातील मूलभूत कर्तव्यांनाही केराची टोपली दाखवली जात आहे. या निर्णयामुळे पर्यावरणीय समतोलात मोठी दरी निर्माण होणार असून, याचे गंभीर परिणाम भावी पिढीला भोगावे लागणार आहेत. – नीलेश कंचनपुरे, अध्यक्ष, वॉर (डब्लूएआर) संस्था, अमरावती. डोंगराचा बराचसा भाग पोखरला जाणार; परवानगी घेतली नाही या प्रकल्पासाठी शासनाने समुहाला २४० हेक्टर जमीन देण्याची तयारी दर्शविली असून अत्यंत घनदाट जंगलात खोदकामही सुरु झाले आहे. आता हे खोदकाम सलग तीन महिने चालणार असून त्यातून डोंगराचा बराचसा भाग पोखरला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींना कोणत्याही प्रकारची विचारपूस करण्यात आली नाही.
Source link
मेळघाटातील वनसंपदेचा बळी देण्याचा घाट:कंपनीचे नाव समोर येताच 23 वर्षांपूर्वी नाकारलेला वीज प्रकल्प करण्यात आला मंजूर