![]()
शहरात मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात हुडी गँग या नव्या टोळीने दहशत माजवली असून, वाळूज परिसरातील सिडको महानगरात मंगळवारी (२८ जुलै) सकाळी एका ५४ वर्षांच्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ४४ हजार रुपयांचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पोलिसांच्या सकाळच्या गस्तीचा (मॉर्निंग पेट्रोलिंग) फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. लता प्रभू भालेकर (५४, रा. सिडको महानगर-१) असे फिर्यादी महिलेचे नाव असून, एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता भालेकर मंगळवारी सकाळी ६.३८ वाजता जिजाऊ चौकाकडून सिडको पाण्याच्या टाकीकडे पायी जात होत्या. मोमोज कॉर्नर जवळ पोहोचल्यावर पाठीमागून एका दुचाकीवर दोन अनोळखी तरुण (अंदाजे २५-२६ वर्षे) आले. दुचाकी चालकाने काळी, तर पाठीमागील तरुणाने तपकिरी रंगाची हुडी घातली होती. गाडीचा वेग कमी करून पाठीमागे बसलेल्या तरुणाने लता यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे जुने मिनी गंठण जोराने हिसकावले. लता यांनी ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केला, मात्र चोरट्यांनी दुचाकी ऑर्किड स्कूलच्या दिशेने सुसाट पळवून नेली. सीसीटीव्हीत आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत चेहरा लपवण्यासाठी जाणीवपूर्वक डोक्यावर टोपी असलेल्या जॅकेटचा (हुडी) वापर केल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसणे पोलिसांसाठी कठीण जाणार आहे. सकाळी ६ ते ८ या वेळेत रस्त्यांवर मोठी गर्दी असते. शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत असताना, अशा वेळी पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गुन्ह्यांमध्ये चोरीच्या दुचाकींचा वापर होण्याची शक्यता असून, या टोळीचे मोठे लागेबांधे आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. बजाजनगरमध्ये पान शॉप फोडले; २. ३३ लाखांचा ऐवज पळवला; ३५ हजारांची रोकड चोरीला; ३ चोरट्यांचे सीसीटीव्हीत चित्रीकरण वाळूज | बजाजनगरमधील मोहटादेवी रोडवरील लोकमान्य चौकात असलेले पान शॉपचे शटर तोडून तीन अज्ञात चोरट्यांनी २ लाख ३३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. यात सिगारेटचा साठा आणि ३५ हजार रुपयांच्या रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी २७ जुलै रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अमोल बिभीषण काळे (३६, रा. सिडको महानगर-१, तिसगाव) यांनी २५ जुलै रोजी रात्री ११.३० वाजता दुकान बंद केले होते. मध्यरात्री २.४० च्या सुमारास दोन दुचाकींवर आलेल्या ३ चोरट्यांनी दुकानाबाहेरील ट्यूबलाइट काढून अंधार केला. कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आतील सीसीटीव्ही बंद केले, मात्र बाहेरची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सकाळी शेजारील फायबरचे मालक बाळू यांनी अमोल यांना दुकान उघडे असल्याची माहिती दिली. पाहणीत दुकानातून फोर स्क्वेअर, एम अँड, फ्यूज, शिफ्ट आणि क्लोव्ह मिक्स या सिगारेट चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. हेड कॉन्स्टेबल अरुण असराम उगळे पुढील तपास करत आहेत.
Source link
‘मॉर्निंग वॉक’ला जाणाऱ्या महिलेचे दीड लाखाचे गंठण पळवले:बजाजनगरमध्ये पान शॉप फोडले; 2. 33 लाखांचा ऐवज लंपास