![]()
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC या नामांकित कोचिंग संस्थेची चौकशी सुरू केली असून, संस्थेचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील शिक्षण क्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या RCC क्लासेसवर CBI ने धाड टाकत संगणक, लॅपटॉप, आयपॅडसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली. त्यामुळे राज्यातील कोचिंग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. शिवराज मोटेगावकर हे शिक्षण क्षेत्रात एम सर, म्हणून ओळखले जातात. साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकर यांनी अत्यंत संघर्षातून स्वतःचे साम्राज्य उभे केले. सुरुवातीच्या काळात ते सायकलवरून विद्यार्थ्यांना खासगी शिकवणी देत असत. 1999 मध्ये त्यांनी भाड्याच्या एका छोट्याशा खोलीत अवघ्या दहा विद्यार्थ्यांसह क्लासेसची सुरुवात केली होती. सुरुवातीला ते स्वतः केमिस्ट्री शिकवत, हाताने नोट्स तयार करत आणि बारावी तसेच मेडिकल प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. पुढे हाच क्लासेस ‘RCC’ या मोठ्या ब्रँडमध्ये बदलला. NEET, JEE आणि MHT-CET परीक्षांसाठी त्यांच्या टेस्ट सिरीज आणि नोट्स राज्यभर प्रसिद्ध झाल्या. दहा दिवस आधीच पेपर फोडला सीबीआयच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, शिवराज मोटेगावकर यांनी 23 एप्रिल 2026 रोजीच नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवली होती. म्हणजे परीक्षा होण्याच्या दहा दिवस आधीच त्यांच्या हातात पेपर पोहोचल्याचा संशय आहे. 14 मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला होता. यावेळी त्यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेशी संबंधित प्रश्न आणि उत्तरपत्रिकेचा डेटा आढळल्याचे सांगितले जात आहे. यामुळे तपास यंत्रणांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहण्यास सुरुवात केली आहे. तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तपासादरम्यान मोटेगावकर यांनी तांत्रिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मोबाईलमधील डेटा डिलीट करण्यात आल्याचे सीबीआयच्या निदर्शनास आले आहे. मात्र, फॉरेन्सिक तपासाद्वारे काही माहिती पुन्हा मिळवण्यात तपास यंत्रणांना यश आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. याशिवाय, मोटेगावकर यांनी विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला प्रश्नपत्रिका पाठवल्याचा संशयही तपासात व्यक्त करण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांनाही ही प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्याचा संशय असून, लाभार्थी विद्यार्थ्यांची नावे विचारल्यानंतर मोटेगावकर यांनी चौकशीत टाळाटाळ केल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर कायद्यांअंतर्गत गुन्हे या प्रकरणात सीबीआयने शिवराज मोटेगावकर यांच्यावर विविध गंभीर कायद्यांअंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा अनुचित प्रकार प्रतिबंधक कायदा 2024 अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत गैरप्रकार घडवून आणणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. तपास यंत्रणा आता या संपूर्ण नेटवर्कमधील इतर व्यक्तींचाही शोध घेत आहेत. पेपर नेमका कुठून आला, कोणाकोणापर्यंत पोहोचला आणि आर्थिक व्यवहार किती झाले याचा तपशील गोळा केला जात आहे. एक व्हिडिओदेखील व्हायरल दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओदेखील समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसत असून, मॉक टेस्टमधील प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत किती आले याबाबत चर्चा करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संशय अधिक गडद झाला आहे. राज्यभर शाखा असलेल्या आणि हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्लासेसचे नाव आता या प्रकरणात समोर आल्याने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सीबीआयचा तपास वेगाने सुरू असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 40 हजार विद्यार्थी RCC मध्ये शिक्षण घेतात गेल्या दोन दशकांत RCC ने मोठा विस्तार केला. लातूरसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर आणि कोल्हापूर येथे संस्थेची केंद्रे सुरू झाली. स्थानिक शिक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, दरवर्षी सुमारे 40 हजार विद्यार्थी RCC मध्ये प्रवेश घेतात. फी संरचनेनुसार या संस्थेचा वार्षिक उलाढाल शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना केमिस्ट्री सोप्या भाषेत शिकवण्याची त्यांची शैली लोकप्रिय ठरली होती. कमी फीमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारा शिक्षक अशी त्यांची प्रतिमा होती. नंतर संस्थेने डिजिटल लर्निंग, राज्यव्यापी टेस्ट सिरीज, अॅप आधारित अभ्यास साहित्य आणि मेंटरशिप कार्यक्रमही सुरू केले. पी. व्ही. कुलकर्णी काही वर्षांपूर्वी RCC क्लासेसमध्ये अध्यापक दरम्यान, NEET पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेला माजी प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर यांच्यातील संबंधांची चौकशी सध्या CBI करत आहे. पी. व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्र विषयाचा तज्ज्ञ असून, त्याच्यावर NEET परीक्षेतील केमिस्ट्रीचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, कुलकर्णी काही वर्षांपूर्वी RCC क्लासेसमध्ये अध्यापन करत होता. स्थानिक सूत्रांच्या मते, कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्यात पूर्वी काही मतभेद झाले होते, मात्र नंतर त्यांच्यात समझोता झाला होता. या पार्श्वभूमीवर दोघांमधील व्यवहार आणि संपर्क तपासले जात आहेत. मॉक टेस्टचे प्रश्न मिळतेजुळते CBI च्या तपासात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. RCC च्या मॉक टेस्टमध्ये विचारले गेलेले काही प्रश्न हे NEET 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते असल्याची तक्रार तपास यंत्रणांना मिळाली आहे. याच संशयावरून RCC वर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांना मॉक टेस्टमधले किती प्रश्न परीक्षेत आले? असे विचारताना दिसतात. विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर या व्हिडिओचीही तपासात नोंद घेण्यात आली आहे. शुक्रवारी त्यांची 11 तास चौकशी CBI ने मोटेगावकर यांना चौकशीसाठी पुण्यात बोलावले होते. शुक्रवारी त्यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा त्यांना तपास पथकासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्यांना अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार, डिजिटल डेटा, कॉल रेकॉर्ड आणि मॉक टेस्ट सिस्टीमची तपासणी करत आहेत.
Source link
मोटेगावकरांकडे 10 दिवसआधीच होता NEET चा पेपर:मोबाईल डेटा डिलीट केला; दहा विद्यार्थ्यांपासून 40 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या एम सरची A टू Z माहिती