![]()
अमरावती पाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही एमडी ड्रग्जचे जाळे पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. मोर्शी पोलिसांनी चांदूरबाजार रोडवर असलेल्या स्मशानभूमीसमोर रेल्वे गेटजवळ केलेल्या कारवाईतून या घटनेला दुजोरा मिळाला आहे. पोलिसांनी त्याठिकाणी अवैधरित्या एम.डी (मेफेड्रोन) बाळगणाऱ्या दोघांच्या ताब्यातून चारचाकी वाहनासह ४ लाख ८० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अटक करण्यात आलेले दोघेही अमरावतीचे रहिवासी आहेत. अमरावती ग्रामीणचे नव्याने रूजू झालेले पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांनी अवैध धंदे करणाऱ्या इसमांविरुद्ध प्रभावी कार्यवाही करून सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण पथके व अंमलदार यांच्यासह ही कारवाई केली. अधिकारी व अंमलदार यांना चांदुरबाजार ते मोर्शी रोडने एका पांढऱ्या रंगाच्या झेस्ट कंपनीच्या चारचाकी गाडीमध्ये दोन इमस सोबत एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ बाळगून गोवंश तस्करी करण्याकरीता जाणार आहे, अशी गोपनीय माहिती त्यांना मिळाली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्रीनंतर सापळा रचण्यात आला. चांदुरबाजार रोडने मोर्शीकडे येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या गाडीची पाहणी केली असता सदर गाडीमधील दोन इसम नामे अब्दुल हफिज अब्दुल मजीद (वय ३९ वर्षे रा. बिसमिल्लाह नगर लालखडी, अमरावती) व अकिल अहेमद जमील अहेमद (वय ३२ वर्षे रा. रेहमतनगर लालखडी अमरावती) हे त्यांचे ताब्यात एम.डि.(मेफेड्रोन) अमली पदार्थ बाळगताना आढळून आले. सदर एम.डी.(मेफेड्रोन) कोणाकडून आणि कुठे आणला होता, याबाबत आरोपींना विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सदर आरोपीतांचे ताब्यातुन एम.डी.(मेफेड्रोन) ५ ग्रॅम किंमत अंदाजे ५० हजार रुपये व दोन अॅडरॉईड मोबाइल किंमत अंदाजे ३० हजार रुपये व पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक (एमएच ०६ बी. पी. ०५१६) किंमत अंदाजे ४ लाख रुपये असा एकूण ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध एन.डी.पी.एस.कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मोर्शी पोलीस पुढील तपास करीत आहे. सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, तुषार चव्हाण, पोलिस अंमलदार छत्रपती करपते, स्वप्नील बायस्कर, अथर्व कोहळे, कुणाल कवडीसाव यांनी केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मध्यरात्री २.३० वाजताचे दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार सागर ढवळे हेसुद्धा घटनास्थळावर उपस्थित होते. चांदुरबाजार ते मोर्शी रोडवरील स्मशानभुमी समोरील रेल्वे गेटजवळ वाहन येताच मोर्शी येथील गुन्हे प्रकटीकरण पथक, तहसीलदार सागर ढवळे, दोन शासकीय पंच व एफ एस एल फॉरेन्सिक चमूसह आरोपींची नाकाबंदी करण्यात आली.
Source link
मोर्शीतही एमडी ड्रग्जचे जाळे, 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त:स्मशानभूमीजवळ पोलिसांची कारवाई, अमरावतीच्या दोघांना अटक