Headlines

येरवडा कारागृहात बंदी बांधवांकडून गणेशमूर्तींची निर्मिती:'प्रेरणापथ' प्रकल्पांतर्गत कैद्यांना मिळाले कलात्मकतेचे व्यासपीठ; समाजप्रवाहात आणण्याचा उद्देश




येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदी बांधवांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. आयुष्याच्या एका वळणावर घडलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणाऱ्या या कैद्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि कलात्मकता निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेमुळे त्यांच्या नव्या आयुष्याचा ‘श्रीगणेशा’ झाला आहे. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान-पुणे आणि आदर्श मित्र मंडळ-पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेली बारा वर्षे ‘प्रेरणापथ’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील चांगला माणूस जागृत करणे, हा या प्रकल्पाचा मूळ उद्देश आहे. याच प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यशाळेत बंदी बांधवांनी माती मळण्यापासून ते प्रत्यक्ष गणेशमूर्ती साकारण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी बंदी बांधवांना मूर्तिकलेचे प्रशिक्षण दिले. विवेक खटावकर यांनी सांगितले की, “त्यांच्यातील ऊर्जा आणि कलात्मकतेला योग्य दिशा मिळाल्यास त्यांच्या हातून अनेक उत्कृष्ट कलाकृती घडू शकतात. माझ्या कलाजीवनातील हा एक अविस्मरणीय दिवस आहे.” अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, अधीक्षक सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक पल्लवी कदम, सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप आणि तुरुंग अधिकारी शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. शिल्पकार शशिकांत राहूकर, अमित कलाल, रोहित गोळे, पुंडलिक खलोलकर, शुभम मेदनकर, प्रवीण सोनवणे आणि संजय मोरे यांनीही या प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. प्रकल्पाचे समन्वयक प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी ‘प्रेरणापथ’ प्रकल्पाची भूमिका स्पष्ट केली. बंदी बांधवांनी बनविलेल्या या गणेशमूर्ती समाजातील मान्यवरांनी खरेदी करून त्यांच्या नव्या आयुष्याला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *