![]()
दलित वस्तीचा निधी दलित वस्त्यांतील विकासकामांसाठीच वापरावा, रमाई घरकुल योजनेतील पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावा, तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय मिळावा, या मागण्यांसाठी नगरसेवक भास्कर भैलुमे यांनी सोमवारी कर्जत नगरपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. प्रभारी मुख्याधिकारी अजय साळवे यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून विविध मागण्यांवर लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. सत्ताधारी पदाधिकारी प्रशासनावर प्रभाव टाकून मनमानी कारभार करीत असल्याचा आणि विरोधी नगरसेवकांच्या प्रभागातील विकासनिधी अन्यत्र वळवला जात असल्याचा आरोप भैलुमे यांनी केला. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील ठराव रद्द करणे, निधीच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करणे, रमाई घरकुल लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान देणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय देणे, या मागण्याही त्यांनी मांडल्या. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ठेकेदारी तत्त्वावर कामावर घेण्याची मागणी करण्यात आली. यापूर्वीही या प्रश्नांवर आंदोलन करण्यात आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाच्या विनंतीनंतर ते स्थगित करण्यात आले होते. सोमवारी पुन्हा आंदोलन करून नगरपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.या आंदोलनावेळी शिवसेना युवानेते सचिन घुले, भाऊसाहेब तोरडमल, रिपाईचे शहराध्यक्ष सोहन कदम, अनुराग भैलुमे, सचिन धेंडे, विशाल भैलुमे, सुमित भैलुमे, किरण भैलुमे, बाळासाहेब चिंदे, दादू माने, बापू शिंदे, दादा आखाडे यांच्यासह मोठ्या संख्येने भीम सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. ठराव २ दिवसांत प्रमाणित करू: मुख्याधिकारी साळवे प्रभारी मुख्याधिकारी अजय साळवे यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील कामांच्या मंजुरीचा ठराव दोन दिवसांत प्रमाणित करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील कामांसाठी सुधारित आदेशानुसार नवीन ठराव घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, तसेच तक्रार प्राप्त कामांची सखोल चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. विषय समित्या व सर्वसाधारण सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पारदर्शकता वाढविणे आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजातील अनधिकृत हस्तक्षेप रोखण्याबाबतही आश्वासन देण्यात आले.
Source link
रमाई घरकुल अनुदान:निधीचा हिशेब द्या, घरकुलाचे पैसे द्या, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वारसांचा प्रश्न ऐरणीवर;भैलुमेंचा ठिय्या