Headlines

‘रिल’च्या जमान्यात भक्तीगीतांतून संस्कारांची सुरेल वाट!:अहमदनगर एज्युकेशनच्या ‘भक्ती सुमन’ स्पर्धेत 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग




भक्ती म्हणजे केवळ देवाचे नामस्मरण नसून मनात चांगले विचार, संस्कार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी शक्ती आहे. हीच भक्ती सुंदर स्वरातून व्यक्त झाली की त्याला वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. विद्यार्थ्यांना भक्तीगीतांच्या माध्यमातून संस्कृती, संत परंपरा आणि अध्यात्मिक वारशाशी जोडण्याचे काम या स्पर्धेतून झाले, असे प्रतिपादन अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात जिल्हास्तरीय ‘भक्ती सुमन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी छायाताई फिरोदिया, विश्वस्त सुनंदा भालेराव, गायक पवन श्रीकांत नाईक व माजी विजेती सरोज पालडिया उपस्थित होते. छोटा व मोठा अशा दोन गटांत झालेल्या स्पर्धेत ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बक्षीस वितरणप्रसंगी डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी, “रिलच्या जमान्यात आपण संस्कृती विसरत चाललो आहोत. प्रसिद्धीपेक्षा सिद्धी महत्त्वाची आहे,” असे सांगितले. भक्तीगीत हे केवळ गाणे नसून जगण्याचे सार असल्याचे त्यांनी नमूद केले. छोट्या गटात आरोही बेडेकर प्रथम, कौशिक नातू द्वितीय तर स्वरूप ढेपे तृतीय ठरले. मोठ्या गटात अथर्व कोरडे प्रथम, ईरा कुलकर्णी द्वितीय तर वरदा कुलकर्णी तृतीय आली. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पुढील वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याचा मानस छायाताई फिरोदिया यांनी व्यक्त केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *