Headlines

रुग्णसेवेच्या आदर्श व्यवसायात सर्व रुग्णांना समान मानून सेवा करा:प्रभजीत सिंह बछेर यांचे प्रतिपादन; ‘जीएमसी’त दीक्षांत समारंभ‎




प्रतिनिधी | अकोला रुग्णसेवा ही सर्वोच्च सेवा असून या आदर्श व्यवसायात आपण सर्व रुग्णांना समान मानून सेवा करावी, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे मानद सचिव प्रभजीत सिंह बछेर यांनी केले. १९ व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना बछेर पुढे म्हणाले की, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील डीन आणि मुन्नाभाई यांचा रुग्णांप्रती अनुक्रमे असलेला वैज्ञानिक व भावनिक, मानवीय दृष्टिकोन आपण निदान व उपचार करताना ठेवला, तर यश निश्चितच आपल्या मागे धावत येईल. याप्रसंगी त्यांनी आठवण करून दिली की, या महाविद्यालयाची पहिली बॅच १९ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी व सध्या मुख्यमंत्र्यांचे सचिव असलेले डॉ. श्रीकर परदेशी यांच्या शुभसंदेशाने बाहेर पडली होती. आज जिल्हाधिकारी तथा रेड क्रॉसच्या अध्यक्षा वर्षा मीना यांनी नव्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. बछेर यांनी सांगितले की, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच रेड क्रॉस सोसायटीने मदतीचा हात दिला आहे. या कार्यक्रमाला रेड क्रॉसचे कार्यकारी सदस्य ॲड. सुभाषसिंह ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माजी अधिष्ठाता डॉ. गजानन आत्राम, कम्युनिटी मेडिसिन विभागप्रमुख डॉ. नीलम सुखसोले, फिजिओलॉजी विभागप्रमुख डॉ. प्रवीण शेगावकर व प्रा. डॉ. प्रज्ञा अत्राम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. दिलीप सराटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना अंतःकरणापासून रुग्णसेवा करण्याची शपथ दिली. हा पदवीदान समारंभ अधिष्ठाता डॉ. उत्कर्ष सोनवाने व उपअधिष्ठाता डॉ. आशिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. सांस्कृतिक समितीचे डॉ. गौरव जिलगिलवार, डॉ. करण तायडे, डॉ. अद्वैत हागे, डॉ. रूपानजीता त्रिपाठी व डॉ. चेतना पारखी तसेच डॉ. अनिकेत उचे, डॉ. श्रेय सिंग, डॉ. नितीन अबुज, डॉ. साहिल तायडे, डॉ. श्रद्धा पीडुरकर, डॉ. श्रेयस घुबडे, डॉ. अभिषेक हाडे आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *