Headlines

रेखा कोंडे यांची ठाकरे गटातून हकालपट्टी:पुण्यातील मारहाण प्रकरणानंतर पक्षाचा निर्णय; कारवाईचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट नाही




शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा रेखा कोंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या विविध कारणांमुळे चर्चेत होत्या. विशेषतः पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आवारात झालेल्या मारहाण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या हकालपट्टीच्या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, 20 नोव्हेंबर रोजी टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानंतर रेखा कोंडे यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला होता. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्षा आरती मारणे-पवार आणि त्यांच्यासोबतच्या महिलांनी मारहाण केल्याचा आरोप कोंडे यांनी केला होता. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हकालपट्टीच्या कारवाईमागील अधिकृत कारण आणि पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे ही कारवाई मारहाण प्रकरणाशी संबंधित आहे की पक्षांतर्गत अन्य काही कारणांमुळे करण्यात आली, याबाबत अधिकृत स्पष्टीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. रेखा कोंडे या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सोशल मीडियातून सातत्याने व्यक्त होत होत्या. त्यांच्या भूमिकेवरून आरती मारणे यांच्याशी वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता पक्षातून हकालपट्टी झाल्याच्या वृत्तामुळे पुण्यातील ठाकरे गटाच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *