![]()
शाळेत जाणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला दुचाकीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन तिची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यातील टेमुर्डा परिसरात घडली. आरोपीच्या कृत्यामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत थेट चालत्या दुचाकीवरून उडी घेत स्वतःची सुटका करून घेतली. या घटनेत ती जखमी झाली असली तरी तिच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी शेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश बाळूराम कुमावत (34) असे असून तो मूळचा बासडी खुर्द, जयपूर (राजस्थान) येथील आहे. सध्या तो बोर्डा, ता. वरोरा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नेमकं प्रकरण काय आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थिनी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला लिफ्ट देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विद्यार्थिनी दुचाकीवर बसली. काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपीने चालत्या दुचाकीवरच विद्यार्थिनीची छेडछाड करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरली. मात्र, तिने प्रसंगावधान राखत स्वतःची सुटका करण्यासाठी थेट चालत्या दुचाकीवरून खाली उडी घेतली. चालत्या दुचाकीवरून उडी घेतल्यामुळे विद्यार्थिनीला दुखापत झाली. त्यानंतर आरोपी दुचाकीसह घटनास्थळावरून पसार झाला. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी शेगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. अवघ्या 24 तासांत आरोपी जेरबंद या प्रकरणी शेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीबाबत सुरुवातीला कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसतानाही पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील माहिती संकलित करणे, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर अवघ्या 24 तासांत गणेश कुमावत याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंग यादव, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोले, सुमित कांबळे तसेच पोलीस कर्मचारी दिलीप सुर, अविनाश तुरणकर, दिनेश ताटेवार आणि प्रशांत गिरडकर यांच्या पथकाने आरोपीचा शोध घेऊन ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव पोलिस करीत आहेत. हेही वाचा.. काहीही झालं तरी मुंबईच्या दिशेने निघणार:पोलिसांनी परवानगी नाकारूनही लक्ष्मण हाकेंची आक्रमक भूमिका, बबनराव तायवाडेंचा मात्र पाठिंबा नाही महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ‘गनिमी काव्याने’ मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे, तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी आज ‘महा एल्गार मोर्चा’ घेऊन मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी लक्ष्मण हाके कोणत्याही परिस्थितीत मुंबईला पोहोचण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या मोर्चाला पाठिंबा नसल्याचे जाहीर केल्याने ओबीसी चळवळीत फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. सविस्तर वाचा..
Source link
लिफ्टचा बनाव करत विद्यार्थिनीला दुचाकीवर बसवले:छेडछाड होताच उडी घेत वाचवला जीव, आरोपी 24 तासांत जेरबंद