महाराष्ट्राच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरीने महायुतीच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक सुरू झा
.
एकनाथ शिंदे काल भीमाशंकर दौऱ्यावर होते. त्यामुळे दौऱ्यामुळे त्यांना मुंबईत परतण्यास उशीर झाला का, हा एक तर्क आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण आणि महायुतीतील विविध मुद्द्यांवरून सुरू असलेली चर्चा पाहता शिंदे यांच्या नाराजीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, आज संध्याकाळी शिंदे दिल्लीला जाण्याची शक्यता असल्याने त्यांच्या गैरहजेरीला आणि दिल्ली दौऱ्याला राजकीय संदर्भ जोडले जात आहेत. मात्र, एकनाथ शिंदे नाराज आहेत, याला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
बैठकीला गैरहजेरी आणि नाराजीची चर्चा का?
मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री उपस्थित नसल्याने साहजिकच अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी घटकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता होती. अशा वेळी एकनाथ शिंदे बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांच्या भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली. शिंदे यांची नाराजी नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र, त्यांच्या गैरहजेरीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आज दिल्लीला जाणार? दौऱ्याने वाढवली उत्सुकता
एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला रवाना होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या आजच्या हालचालींकडे विशेष लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहिल्यानंतर दिल्ली दौरा होत असल्याने या दौऱ्यामागे नेमका कोणता राजकीय विषय आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीमध्ये शिंदे कोणाची भेट घेणार, केंद्रीय नेतृत्वाशी कोणत्या विषयावर चर्चा होणार किंवा हा दौरा पूर्वनियोजित आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे शिंदे यांची नाराजी, मंत्रिमंडळ बैठकीतील गैरहजेरी आणि दिल्ली दौरा या तीनही गोष्टी सध्या महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
जीडीपीच्या आकडेवारीवरून मोदींचे कौतुक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भारताचा जीडीपी विकासदर 7.8 टक्क्यांवर पोहोचल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. जागतिक पातळीवरील आर्थिक अनिश्चितता, युद्धाचे सावट आणि मंदीचा दबाव असतानाही भारताने 7.8 टक्क्यांचा विकासदर नोंदवला, ही देशाच्या आर्थिक ताकदीची बाब असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आणि जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार? १४ आमदारांच्या पक्षप्रवेशाचा दावा
दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे तब्बल १४ आमदार नवरात्रीपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा शिंदे गटातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे. सध्या ठाकरे गटाकडे विधानसभेत २० आमदार असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी १४ आमदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यास ठाकरे यांच्या पक्षाच्या संख्याबळावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मात्र, या १४ आमदारांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. संबंधित आमदारांकडूनही पक्षांतराबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हा दावा सध्या केवळ राजकीय चर्चेपुरता मर्यादित आहे.
तीन मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी?
शिंदे गटातील नेत्याच्या दाव्यानुसार, ठाकरे गटातील आमदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन ही मोहीम राबवली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. या संभाव्य पक्षप्रवेशानंतर काही आमदारांना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, अशीही चर्चा आहे. १४ पैकी सहा आमदारांना मंत्रिपद, राज्यमंत्रीपद किंवा महत्त्वाची खाती देण्याबाबत विचार सुरू असल्याचा दावा करण्यात आला आहे. काहींना महामंडळांचे अध्यक्षपद देण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा
ठाकरे गटातील आमदारांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या या दाव्याला शिंदे गटातील काही नेत्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’शी जोडले जात आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांशी संपर्क साधला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या संपूर्ण घडामोडीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत आणि १४ आमदार पक्षांतर करणार असल्याचा दावा कितपत खरा ठरतो, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीतील अनुपस्थितीने सुरू झालेली नाराजीची चर्चा आणि त्यानंतरचा संभाव्य दिल्ली दौरा यामुळे महाराष्ट्राच्या सत्ताकारणाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे यांच्या गैरहजेरीमागचे नेमके कारण आणि दिल्ली दौऱ्यानंतर त्यांच्या राजकीय हालचाली काय असतील, याकडे आता विशेष लक्ष असणार आहे.
हेही वाचा…
2 कोटी मतदार वगळले, मुंबईत 36 लाख; हा मोठा कट!:संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याची टीका

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत तब्बल दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा करताना मुंबईतच 36 लाख मतदार कमी झाल्याचे राऊत यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जीडीपी वाढीचे आकडे सांगण्यापेक्षा महागाई, बेरोजगारी, रुपयाची घसरण आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानावर सरकारने उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी केली. याशिवाय डॉक्टरच्या आत्महत्येचे प्रकरण, शिक्षण कार्यालयातील पंतप्रधानांच्या फोटोचा वाद, कुंभमेळा आणि अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित भ्रष्टाचार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च तसेच मराठी भाषा या मुद्द्यांवरही राऊत यांनी भूमिका मांडली. वाचा सविस्तर