Headlines

Raju Shetti vs Rajesh Kshirsagar: Kolhapur Shaktipith Highway Controversy


शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातील राजकारण चांगलेच तापले आहे. शेतकरी नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्गासाठी मोजणी सुरू केल्यास अधिकाऱ्यांना ‘चोपून काढू’ असा इशारा दिल्याने या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-

.

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोधाची धार वाढत असताना या प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात राजकीय नेत्यांच्या भूमिका स्पष्ट होत आहेत. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यानंतर आता करवीरचे शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांनीही महामार्गाला विरोध दर्शवला आहे. मात्र, महायुतीतीलच आमदाराने प्रकल्पाला विरोध केल्याने राजेश क्षीरसागर यांनी नरके यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.

सरकारच्या योजनांना विरोध करू नका

शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी करण्यास विरोध करताना राजू शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना चोपून काढण्याचा इशारा दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सत्तेचा लाभ घेऊन सरकारच्या योजनांना विरोध करण्याची भूमिका योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. क्षीरसागर यांच्या या वक्तव्यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या प्रश्नाला आता केवळ शेतकरी विरुद्ध सरकार असे स्वरूप न राहता महायुतीतील अंतर्गत मतभेदांचाही रंग चढताना दिसत आहे.

चंद्रदीप नरके यांच्या भूमिकेवरही क्षीरसागरांचा सवाल

शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. करवीर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन नरके यांनी महामार्गाला विरोध केला आहे. मात्र, महायुतीचा घटक असलेल्या शिवसेनेच्या आमदारानेच सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध केल्याने क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेण्याऐवजी या प्रश्नावर पक्षाच्या पातळीवर चर्चा व्हावी, असा सूर त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून आला.

सतेज पाटील-धनंजय महाडिक एकत्र येणार? क्षीरसागर म्हणाले…

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची निवडणूकही आता चर्चेत आली आहे. गोकुळच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि भाजपचे नेते धनंजय महाडिक एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजेश क्षीरसागर यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवण्याच्या सूचना दिल्याचा दावा क्षीरसागर यांनी केला. त्यामुळे महायुतीच्या चौकटीबाहेर जाऊन धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांची स्वतंत्र युती होण्याची शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले. “धनंजय महाडिक महायुती सोडून कोणतेही काम करत नाहीत. महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवण्याचे ठरले असताना वेगळ्या युतीच्या चर्चा कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सतेज पाटील यांच्या राजकीय हालचालींवरही क्षीरसागर यांनी टीका केली. प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या भेटीगाठी म्हणजे ‘स्टंटबाजी’ असल्याचेही क्षीरसागर म्हणाले.

डॉल्बीच्या मुद्द्यावर प्रशासनाला सावधगिरीचा सल्ला

कोल्हापुरातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉल्बीच्या वापराचा मुद्दाही क्षीरसागर यांनी उपस्थित केला. डॉल्बीला समर्थन करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार दोन बेस आणि दोन टॉप वापरण्याला परवानगी असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवात तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी होत असले तरी ध्वनिप्रदूषण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक गणेश मंडळांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.

याचवेळी प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनाही त्यांनी अप्रत्यक्षपणे सावध केले. “आपल्याकडे असलेले चार प्रमुख अधिकारी सगळे डॉक्टर आहेत; मात्र त्यांनी एकाच वेळी मोठे इंजेक्शन देऊ नये,” अशी मिश्कील टिप्पणी करत कोणताही निर्णय घेताना परिस्थितीचा समतोल विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

40 वर्षे पक्षासाठी काम, तरी मंत्रिपद नाही; क्षीरसागरांची खंत

या सर्व राजकीय मुद्द्यांसोबतच राजेश क्षीरसागर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील नाराजीही उघडपणे व्यक्त केली. तब्बल ४० वर्षे पक्षासाठी काम करूनही मंत्रिपद न मिळाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडताना संपूर्ण संघटना घेऊन आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो, असे क्षीरसागर यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही, याचे दुःख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या काही अडचणी असू शकतात, हेही त्यांनी मान्य केले. त्यामुळे थेट नेतृत्वावर टीका करण्याऐवजी त्यांनी मंत्रिपदाच्या फेरबदलाच्या आश्वासनाची आठवण करून दिली.

अडीच वर्षांनी बदल होईल, त्या शब्दाची आठवण

प्रकाश आबिटकर यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेला मिळावे, अशी मागणी आपण सर्वप्रथम केली होती, असे क्षीरसागर यांनी सांगितले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात बदल केला जाईल, असे सांगितले होते. आता त्या शब्दाची अंमलबजावणी करण्याची वेळ आली असल्याचे क्षीरसागर यांचे म्हणणे आहे. “तो आमचा हक्क आहे,” असे सांगत त्यांनी आपल्याला मंत्रिपद देऊन काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कोल्हापूर जिल्ह्यात राजेश क्षीरसागर शिवसेनेचा ब्रँड

आपल्या राजकीय ताकदीबाबतही क्षीरसागर यांनी यावेळी मोठे विधान केले. कोल्हापूर जिल्ह्यात राजेश क्षीरसागर हे शिवसेनेचा ‘ब्रँड’ असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी असते. शिवसेनेच्या इतर कोणत्याही नेत्याच्या कार्यालयाबाहेर अशी गर्दी दिसत नाही, असा दावा त्यांनी केला. आतापर्यंत आपण याबाबत उघडपणे बोललो नव्हतो; मात्र आता आपल्याला पक्षात अधिक मोठी जबाबदारी देऊन काम करण्याची संधी मिळावी, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा…

2 कोटी मतदार वगळले, मुंबईत 36 लाख; हा मोठा कट!: संजय राऊतांचा केंद्र व राज्य सरकारवर निशाणा; निवडणूक आयोग भाजपचा एजंट असल्याची टीका

महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवरून राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकार, निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील प्रारूप मतदार यादीत तब्बल दोन कोटी मतदार वगळल्याचा दावा करताना मुंबईतच 36 लाख मतदार कमी झाल्याचे राऊत यांनी म्हटले. ही बाब अत्यंत गंभीर असून यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप त्यांनी केला. याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आर्थिक दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.