Headlines

वसमतमध्ये भरदुपारी चोरीचा थरार!:कारची काच फोडून 10 लाखांची रोकड पळवली, अवघ्या पाच मिनिटांत चोरट्यांनी साधला डाव




वसमत शहरातील युनीयन बँकेसमोरून चोरट्यांनी कारची काच फोडून अवघ्या पाच मिनीटात १० लाखांची रोकड पळविल्याची घटना मंगळवारी ता. ९ भर दुपारी घडली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांच्या शोधासाठी वसमत पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळसगाव येथील प्रशांत डाखोरे यांनी जमीन खरेदी केली होती. या जमीनीच्या व्यवहारासाठी ते आज दुपारच्या सुमारास वसमत येथील युनीयन बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बँकेतून १० लाख रुपयांची रोकड काढली. त्यानंतर त्यांनी कारमध्ये रोकड ठेवली. त्यानंतर पुन्हा बँकेत गेले अन अवघ्या पाच मिनीटात परत आले. मात्र यावेळी त्यांना कारची काच फुटलेली दिसली शिवाय कारच्या समोरच्या सीटवर ठेवलेली १० लाख रुपये रोकड असलेली पिशवी गायब झाल्याचे दिसून आले. या प्रकारानंतर त्यांनी परिसरात पाहणी केली मात्र त्यांना काहिही माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी पोलिसांना सविस्तर माहिती दिल्यानंतर पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख नय्यर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी बँकेच्या परिसरातील दुकानांच्या बाहेरील सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी केली असता दुचाकीवर दोन चोरटे दिसून आले त्यांनी तोंडाला रुमाल बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण झाले मात्र पोलिसांनी वसमत शहरातील सर्व फुटेजची तपासणी केल्यानंतर चोरटे नांदेडच्या दिशेने पळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *