![]()
विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने एकतर्फी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, नागपूर, अमरावती आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी दणदणीत विजय संपादन केला. नागपूर मतदारसंघात भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. डॉ. पोतदार यांना ६८२ मते मिळाली, तर लोंढे यांना केवळ १३० मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत महाविकास आघाडीची ९९ मते फुटल्याचे स्पष्ट झाले, तर एमआयएम आणि मुस्लिम लीगचे नगरसेवक तटस्थ राहिले. ११ मते अवैध ठरली. भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी भाजपच्या पथ्यावर पडली. भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी ३०२ मते मिळवत सहज विजय मिळवला. काँग्रेसने ऐनवेळी अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांना पाठिंबा दिला होता, ज्यांना १५४ मते मिळाली. काँग्रेसचे प्रफुल्ल अग्रवाल आणि माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी अर्ज मागे घेतल्याने ब्राह्मणकर यांचा मार्ग मोकळा झाला होता. अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांचा सुपडासाफ करत ऐतिहासिक विजय नोंदवला. एकूण ४२१ वैध मतांपैकी पोटे यांना तब्बल ३९० मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी निलेश विश्वकर्मा यांना केवळ ३१ मते मिळाली. धक्कादायक बाब म्हणजे, काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना शून्य मते मिळाली. निवडणुकीच्या ऐनवेळी देशमुख रुग्णालयात दाखल झाल्याने काँग्रेसची अवस्थाही ‘आयसीयू’त गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. विदर्भातील इतर दोन जागांवर मतदानाची गरज भासली नाही. चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे अरुण लखानी तर यवतमाळमधून शिवसेना (शिंदे गट) उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी बिनविरोध निवडून आले. यवतमाळमध्ये काँग्रेसचे साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या शैलेश अग्रवाल यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतले होते. भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मते मिळाली. काँग्रेसकडे अधिकृतपणे ११९ मते असतानाही ईश्वरकर यांना ३५ मते अधिक मिळाल्याने महायुतीतील काही मतदारांनी त्यांना मतदान केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Source link
विदर्भात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपचा मोठा विजय:काँग्रेसला धक्का, पोतदार, ब्राह्मणकर, पोटे पाटील विजयी