Headlines

विद्यापीठ पातळीवर शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद उपक्रम घेणार- कुलगुरू खर्चे:डॉ. खर्चे यांची ग्वाही; शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणार‎




प्रत्येक पिकातील समस्यांचे निवारण करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादाचे कार्यक्रम घेण्यात येतील. यामध्ये आपल्या सूचना आम्हाला संशोधनासाठी मोलाच्या ठरतील. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईल अशी ग्वाही महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी दिली. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प व सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांच्यासाठी ऊस पिकावरील हुमणी व पायरीला किडीचे नियंत्रण या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मल्हारवाडी येथील राजेंद्र येवले उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रशांत बोडके, डॉ. गोरक्ष ससाणे, डॉ. साताप्पा खरबडे, किटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. उत्तम कदम, डॉ. राजेंद्र भिलारे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे व प्रगतशील शेतकरी लक्ष्मण गाडे उपस्थित होते. नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिकामध्ये हुमणी, पायरीला व लोकरी मावा या किडींची समस्या यावर्षी वाढली आहे. या किडींचे व्यवस्थापन करण्यासाठी शेतकरी बांधवांनी कृषी विद्यापीठाने तयार केलेल्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा असे आवाहनही कुलगुरू डॉ. खर्चे यांनी केले. ते पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठामध्ये दहा वर्षांपासून विविध पिकांच्या हवामान अनुकूल वाण निर्मितीवर भर दिला जात आहे. सध्या वाण निर्मितीसाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो. हा कालावधी कमी करण्यासाठी स्पीड ब्रीडिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्याबद्दल प्रक्रिया सुरू आहे. यावेळी झालेल्या चर्चासत्रात डॉ. उत्तम कदम यांनी उसावरील पायरीला किडीचे व्यवस्थापन, डॉ. राजेंद्र भिलारे यांनी उसाचे सुधारित वाण, डॉ. सखाराम आघाव यांनी उसावरील हुमणी किडीचे व्यवस्थापन आणि राजेंद्र येवले यांनी किफायतशीर शेतीसाठीची पंचसूत्री या विषयांवर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध घडीपत्रिकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी बापूसाहेब शिंदे, कृषीभूषण सुरसिंग पवार, अण्णासाहेब बाचकर, वसंत गाडे, समीर पठाण, अमित धिमते, साईनाथ बेल्हेकर, निर्मला गाढे, यमुनाथ आघाव, सुदाम पवार, लक्ष्मण गाडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी जैविक किडनाशकांचा वापर करावा डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले, हवामानातील बदल, पर्जन्यमानात तसेच रात्रीच्या तापमानात झालेली घट याचा परिणाम किडींच्या जीवनचक्रावर होत आहे. या किडींचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी विद्यापीठाने जैविक किडनाशकांची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक किडनाशकांचा वापर कमी करून जैविक किडनाशकांचा वापर वाढवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *