![]()
वाडेगाव उत्सवाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील संकटग्रस्त घटकांना मदतीचा हात देण्याची सामाजिक बांधिलकी श्री जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगाव येथील विद्यार्थ्यांनी जपली आहे. दिवाळीनिमित्त सुगंधी उटण्याची निर्मिती व विक्री करून त्यातून मिळालेला २,१०० रुपयांचा नफा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देऊन विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. शाळेच्या स्काऊट-गाइड व कब-बुलबुल पथकातील ६० विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याने ५० रुपयांचे भांडवल गोळा केले. त्यानंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उटण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे, दळण, निर्मिती आणि पॅकिंग ही सर्व कामे विद्यार्थ्यांनी स्वतः केली. या उठण्याची विक्री करून सुमारे ७० टक्के नफा मिळवत एकूण २,१०० रुपयांचा निधी जमा करण्यात आला. हा जमा झालेला नफा स्वतःकडे न ठेवता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानुसार ६ नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांची भेट घेऊन २,१०० रुपयांचा धनादेश निधी त्यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व प्रणव मानकर उपस्थित होते. ग्रामीण भागातील ही शाळा मर्यादित साधनसामग्रीतही विद्यार्थ्यांवर सेवाभाव, श्रमप्रतिष्ठेचे संस्कार सातत्याने रुजवत आहेत. निधी सुपूर्द करताना विद्यार्थिनी. पैशांपेक्षा मन मोठे असावे “मदत करण्यासाठी वय किंवा संपत्ती मोठी असण्याची मुळीच गरज नसते, तर त्यासाठी मन मोठे असावे लागते,’ हा संवेदनशील संदेश वाडेगावच्या शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून समाजाला दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे शाळा व्यवस्थापन, पालक व परिसरातून विशेष कौतुक होत आहे.
Source link
विद्यार्थ्यांच्या दिवाळीच्या आनंदातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात:सार्थक दिवाळी, श्री जागेश्वर स्कूलच्या स्काऊट-गाइड, कब-बुलबुल पथकाचा उपक्रम