![]()
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रियेत होणारा मोठा खर्च आणि वेळेची बचत व्हावी, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सामोपचाराची भूमिका घ्यावी, असे ते नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध निवडणुकांवरील अवाढव्य खर्च कमी करण्याबाबत वेळोवेळी केलेल्या आवाहनाचा दाखला मंत्री बावनकुळे यांनी दिला. विधान परिषदेच्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर प्रवास, प्रचार आणि संसाधनांवर खर्च होतो. हा सर्व खर्च टाळता येणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील सर्वच विरोधी नेत्यांनी सकारात्मकता दाखवून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती बावनकुळे यांनी केली. नागपूरमधील संख्याबळाचा विचार करता, महायुतीची स्थिती अत्यंत मजबूत आहे. येथील ६०० मतांपैकी ४०० हून अधिक मते भाजप आणि महायुतीकडेच आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट आहे. संख्याबळ नसतानाही निवडणुका लढवून उगाचच खर्च वाढवण्यापेक्षा विरोधकांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महसूलमंत्र्यांनी महायुतीच्या अंतर्गत तयारीबद्दलही माहिती दिली. महायुतीमध्ये जागावाटपाचा ९९ टक्के फॉर्म्युला आधीच निश्चित झाला असून, लवकरच उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. हे ही वाचा… विदर्भाच्या राजकारणात मोठी खळबळ:काँग्रेसचे 60 हून अधिक नगरसेवक ‘नॉट रिचेबल’; विजय वडेट्टीवारांचा भाजपवर गंभीर आरोप महाराष्ट्रात १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचे गणित अद्याप सुटलेले नसतानाच, पूर्व विदर्भात अत्यंत खळबळजनक राजकीय घडामोड समोर आली आहे. अधिकृत उमेदवारांची नावे निश्चित होण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांची पळवापळवी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील सिंदेवाही नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि महत्त्वाच्या नगरसेवकांचे फोन अचानक बंद झाले असून, ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एवढेच नव्हे तर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे तब्बल ६० हून अधिक नगरसेवक एकाच वेळी गायब झाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सविस्तर वाचा…
Source link
विधान परिषद निवडणूक बिनविरोध करा:चंद्रशेखर बावनकुळेंचे विरोधी पक्षांना आवाहन; शरद पवार, उद्धव ठाकरेंना थेट सहकार्याची विनंती