Headlines

वैजापुरात दुष्काळाचे सावट गडद; ठाकरे गट तहसीलवर:शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत देण्याची मागणी‎




पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने तालुक्यात दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत उभी पिके करपत असताना पाणी आणि चाऱ्याचे संकटही दारात येऊन ठेपले आहे. मात्र प्रशासनाला अद्याप परिस्थितीचे गांभीर्य दिसत नसल्याचा आरोप करत ‘झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी तहसील गाठली’, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला. जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील निकम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी तहसील कार्यालय गाठून नायब तहसीलदार महाजन यांना मागण्यांचे निवेदन दिले. मूग, सोयाबीन, तूर, मका, भुईमूग आदी पिकांसाठी हेक्टरी एक लाख रुपये मदत जाहीर करावी, कोरडवाहू पिकांना आर्थिक मदत द्यावी, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टँकरचे नियोजन करावे तसेच जनावरांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. ग्रामीण भागात रोजगार हमीची कामेही मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत, अशी मागणी ठाकरे गटाने केली. शिवार करपल्यानंतर पंचनाम्यांची कागदे रंगविण्यापेक्षा आजच बांधावर उतरून वास्तव पाहा, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली. दुष्काळाची तीव्रता आणखी वाढल्यानंतर प्रशासनाने धावपळ करण्याऐवजी आताच उपाययोजना सुरू कराव्यात; अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही देण्यात आला. यावेळी रमेश सावंत, विठ्ठल डमाळे, अशोक चव्हाण, मुरलीधर थोरात, कैलास बाळस्कर, रमेश शिंदे यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *