![]()
पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले, तरी पैठण तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही न पडल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी ७८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील खरीप पिके संकटात सापडली आहेत. जायकवाडी प्रकल्पाचा अपवाद वगळता तालुक्यातील बहुतांश जलसंधारण प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा २५ टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. त्यामुळे खरीप पिकांसह आगामी रब्बी हंगाम आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईची चिंता आतापासूनच वाढली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला असताना यंदा तालुक्यात सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर आदी खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली. सुरुवातीच्या पावसाने पिकांना चांगली उभारी मिळाली; मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक भागांत पिके करपण्याच्या मार्गावर असून आता परतीच्या पावसावरच शेतकऱ्यांची भिस्त आहे. ६४ प्रकल्पांची तहान कायम मृद व जलसंधारण विभागांतर्गत तालुक्यात २४ पाझर तलाव, ३६ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आणि चार लघुसिंचन तलाव असे ६४ जलसंधारण प्रकल्प आहेत. याशिवाय ५५ हून अधिक पाझर तलाव आहेत. मात्र, अपुऱ्या पावसामुळे या जलसाठ्यांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. बहुतांश प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी २५ टक्क्यांच्या आसपासच पाणी असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. जलसंधारण विभागाचे अभियंता संदीप राठोड आणि पाझर तलाव विभागाच्या अभियंता अनुजा मुजीमदार प्रकल्पांची पाहणी करून पाणीसाठा व आवकेचा आढावा घेत आहेत. गतवर्षी ओसंडले, यंदा तळ दिसू लागला: गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे तालुक्यातील पाझर तलाव, बंधारे आणि लघुसिंचन प्रकल्प तुडुंब भरले होते. त्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली होती. यंदा मात्र परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास आगामी उन्हाळ्यात ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता शेतकरी दीपक मोरे यांनी व्यक्त केली. आहे ते पाणी जपून वापरले जावे, परिस्थिती गंभीर पैठण तालुक्यातील ग्रामीण भागातील शेती मोठ्या प्रमाणावर पाझर तलावांच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या पाऊस नसल्याने पाझर तलावांतील पाणीसाठा कमी झाला आहे. पुढील काही दिवसांत तो शून्यावर जाण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका तालुक्यातील सिंचन क्षेत्राला बसू शकतो, आहे ते पाणी जपून वापरले जावे. -संदीप राठोड, अभियंता जलसंधारण संभाजीनगर
Source link
दुष्काळाच्या झळा:दीड महिन्यापासून पावसाने फिरवली पाठ; ७८ हजार हेक्टरवरील पिके संकटात