![]()
कन्नड तालुक्यात महिनाभर पावसाने खंड दिल्याने खरीप पिक धोक्यात आले आहे. या दुष्काळाचे सावट पोळा सणावर पडल्याने आठवडी बाजारात बैल साज खरेदीत शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. कन्नड येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. पोळा सणाच्या पूर्वीच्या आठवडी बाजारात शेतकऱ्यांत निरूत्साह दिसून आला. सातकुंड येथील बैल साज विक्रीसाठी आलेले एकनाथ सिताराम चव्हाण यांनी सांगितले की, दरवर्षी पोळा सणाच्या पूर्वी येणाऱ्या बाजारात मोठी उलाढाल होते. यावर्षी म्होरकी, माटुकी, गोंडा, नाथ अल्प प्रमाणात विकल्या गेली. नाना मोहन टिकरे यांनी सांगितले की, आम्ही दरवर्षी बैलाचा साज श्रृंगार तयार करतो. दि.१० सप्टेंबर गुरुवार रोजी पोळा सण आहे. यावर्षी ८० हजार रुपये गुंतवणूक करून बैल साज बनवला. पण विक्री झाली नाही. सागर मसरे यांनी सांगितले की, दिड महिन्यांपासून बैल साज बनवण्यासाठी मेहनत घेतली. वेसण, जोते, गोफ, नाथ यासाठी लागणाऱ्या कवड्या, गोंडे,कासरा, आरसे आदि कच्चा माल जळगाव येथून आणला. महागाईमुळे झुली आणल्या नाही. पाणी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी साज घेण्यासाठी हात आखडता घेतला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सण पोळा असूनही या सणावर दुष्काळाचे सावट पडले आहे.
Source link
कन्नड तालुक्यात पोळा सणावर दुष्काळाचे सावट:आठवडी बाजारात साज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा हात आखडता