Headlines

शरद पवारांना मोदींचा फोन हा केवळ शिष्टाचाराचा भाग:पृथ्वीराज चव्हाणांचे स्पष्टीकरण, राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? प्रश्नावर मौन




राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून विचारपूस केली होती. यावेळी मोदी यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची काळजी व्यक्त केली होती. तसेच, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुमचे आशीर्वाद असू द्या, असेही मोदी यांनी म्हटल्याची माहिती शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिली होती. मोदी आणि पवार यांच्यात झालेल्या या संवादानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली होती. विशेषतः पवार कुटुंब आणि भाजप यांच्यातील राजकीय समीकरणांबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. लोकमतला दिलेल्या मुलाखतीत बोलताना त्यांनी मोदी यांनी शरद पवार यांना केलेल्या फोनचा राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. एखादी व्यक्ती आजारी असताना तिच्या प्रकृतीची विचारपूस करणे हा शिष्टाचाराचा भाग असतो. त्यामुळे या फोनकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता नसल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. मोदींच्या फोनमागे राजकीय अर्थ काढू नये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना फोन केल्यानंतर विठ्ठल मणियार यांनी या संवादाची माहिती सार्वजनिक केली होती. मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करताना सुप्रिया सुळे आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही आशीर्वाद द्या, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे त्यांनी सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे, एकीकडे निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आणि केंद्र सरकारच्या विरोधात इंडिया आघाडीतील पक्ष एकत्र येत असताना दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याशी संवाद साधल्याने या भेटीच्या राजकीय परिणामांबाबत चर्चा सुरू झाली होती. याच मुद्द्यावर पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, ही केवळ शिष्टाचाराची आणि चौकशीची बाब आहे. एखादी व्यक्ती आजारी असताना तिची विचारपूस करणे हा सामाजिक शिष्टाचाराचा भाग आहे. मोदी यांनी त्यापुढे तुम्ही आता जास्त दगदग करू नका, आम्ही बघतो, अशा अर्थाने जे वक्तव्य केले, त्यातूनही काळजी व्यक्त होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का? दरम्यान, मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबाबतही प्रश्न विचारण्यात आला. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेससोबत ठामपणे राहील का? या पक्षाच्या भूमिकेबाबत तुम्हाला काही शंका आहे का? तसेच भविष्यात हा पक्ष भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सावध भूमिका घेतली. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देऊ शकतो; मात्र ती देणार नाही, असे म्हणत त्यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्यांच्या या उत्तरामुळे शरद पवार यांच्या पक्षाच्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबत त्यांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे, याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. इंडिया आघाडीच्या एकजुटीच्या पार्श्वभूमीवर चर्चांना महत्त्व केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांची इंडिया आघाडी एकत्र येत असताना महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांकडेही लक्ष लागले आहे. शरद पवार आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संबंध, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील भूमिका तसेच भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर सातत्याने चर्चा होत असते. अशा परिस्थितीत मोदी यांनी शरद पवार यांची केलेली विचारपूस आणि त्यानंतर विठ्ठल मणियार यांनी दिलेली माहिती चर्चेचा विषय ठरली. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी या फोनकडे केवळ शिष्टाचार म्हणून पाहण्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार का, या थेट प्रश्नावर उत्तर देण्याचे टाळल्याने त्यांच्या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. हेही वाचा… दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी मुख्यमंत्र्यांची दिवाळी:फडणवीसांचा लोहारी सावंग्यात मुक्काम, शेतकऱ्यांशी साधला संवाद राज्यातील शेतकरी यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आणि खरीप हंगामातील नुकसानीमुळे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अनेक भागांत पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा गावाला भेट देत शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी केली. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांनी गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्कामही केला. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *