![]()
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनेत मोठा फेरबदल करण्यात आला असून, महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे यांच्या जागी नव्या नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीनंतर ॲड. अंजली साळवे-विठणकर यांच
.
पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत असलेल्या अंजली साळवे यांच्याकडे आता राज्याच्या महिला नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. या निवडीमुळे यापूर्वी समोर आलेल्या संभाव्य बदलांच्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरून या निवडीची घोषणा करण्यात आली असून, नवनियुक्त अध्यक्षांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
पक्षवाढ आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत अंजली साळवे या राज्यातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडतील, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. राज्यातील महिलांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा या निवडीनिमित्त व्यक्त करण्यात आली आहे.
कोण आहेत ॲड. अंजली साळवे-विठणकर?
ॲड. अंजली साळवे-विठणकर या नागपूर येथील नामांकित वकील, समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांनी चंद्रपूर येथून कायद्याची पदवी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून कायद्यात पीएचडी संपादन केली आहे. महिला व बालहक्क तसेच ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी त्या सक्रियपणे काम करतात. यापूर्वी त्यांनी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या समुपदेशक आणि नागपूर बाल कल्याण समितीच्या सदस्य म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.