![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वसन आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. छातीतील संसर्गामुळे केले होते दाखल वाढते वय आणि सततच्या दौऱ्यांमुळे शरद पवार यांना श्वसनाचा आणि छातीत संसर्गाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना दोन दिवसांपूर्वी तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. रुग्णालयात असताना रंगल्या होत्या राजकीय चर्चा शरद पवार रुग्णालयात दाखल असताना राज्याच्या राजकारणात मात्र मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली होती. या भेटीगाठींमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. रोहित पवारांनी दिला होता चर्चांना पूर्णविराम रुग्णालयातील या भेटीगाठींवरून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना कालच आमदार रोहित पवार यांनी पूर्णविराम दिला होता. “पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे तब्येत खालावलेली असताना पंतप्रधान मोदींसह अनेक नेते त्यांची विचारपूस करतात. आजारी व्यक्तीला भेटायला येण्यात कोणतंही राजकारण नसतं,” असे रोहित पवार म्हणाले होते. मात्र, त्याचवेळी त्यांनी “या भेटीच्या फोटोंचा आणि व्हिडिओचा राजकीय स्वार्थासाठी वापर करू नये,” असा दमही अजित पवार गटाला दिला होता. डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी, शरद पवार यांना डॉक्टरांनी काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. “जास्त स्ट्रेस घेऊ नका, जास्त बोलू नका आणि काही दिवस लोकांना भेटणे टाळा,” अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस शरद पवार हे आपल्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानीच विश्रांती घेणार असून, त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतरच ते पुन्हा एकदा राजकीय कामकाजात आणि बैठकांमध्ये सक्रिय होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ————– हेही वाचा.. भाजपला लोकसभेत 36 खासदार कमी म्हणून विलीनीकरणाच्या अफवा: संजय राऊत म्हणाले- अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांचा आता कोणताही मानसन्मान राहिलेला नाही
“अजित पवार गटात ज्येष्ठ नेत्यांचा आता कोणताही मानसन्मान राहिलेला नाही. पक्षात कोणी कितीही मोठ्या पदावर असले तरी पक्षाची सर्व सूत्रे आता पार्थ पवार यांच्याकडेच आहेत; त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या वरिष्ठ नेत्यांना आता पार्थ पवारांच्या हाताखालीच काम करावे लागत आहे. स्वतःच्या पक्षात प्रचंड अडचणीत आल्यामुळेच हे नेते आता विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत. मात्र, केवळ तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून आदरणीय शरद पवार साहेब भाजपसोबत जातील, असे कदापि होणार नाही,” असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link