![]()
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य सेविका आणि आशा सेविका घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. विद्यार्थी हे घरापर्यंत पोहोचणारे आरोग्यदूत असून त्यांच्या माध्यमातून
.
अहिल्यानगर मनपातर्फे राबविण्यात येत असलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर साप्ताहिक उपक्रमांतर्गत केडगाव येथील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर येथे डेंग्यू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून डेंग्यू आजाराची कारणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व याबाबत प्रभावी जनजागृती केली. कार्यक्रमानंतर परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणीही करण्यात आली.
मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले, डेंग्यू हा जीवघेणा आजार असून त्याबाबत समाजात जनजागृती होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियान राबवून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शाळेतील विद्यार्थी घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्याविषयी जागरूक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त हरीकल्याण येलगट्टे, माजी सभापती मनोज कोतकर, नगरसेविका अश्विनी लोंढे, सुमित लोंढे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजुरकर, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, उमेश कोतकर, डॉ. परमेश्वर काळे, प्रभाग अधिकारी सुखदेव गुंड, निलेश चिपाडे, अॅड. वैभव कदम, साथरोग नियंत्रक डॉ. सृष्टी बनसोडे, डॉ. गिरीश दळवी, स्मिता खिलारी आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सृष्टी बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले तर आभार डॉ. गिरीश दळवी यांनी मानले.
महापालिकेला सापडले ३६० दूषित पाणीसाठे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आतापर्यंत ३६० पाणीसाठे दूषित आढळले असून त्याठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी धूर व औषध फवारणी केली जात आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून रक्त चाचण्याही करण्यात येत आहेत. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही महानगरपालिकेची जबाबदारी असून त्यानुसार आरोग्य सेविका आणि आशा सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना आरोग्यविषयक माहिती देत आहेत. डेंग्यू प्रतिबंधासाठी पाणी साठवणुकीच्या ठिकाणांची नियमित तपासणी आणि परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.