![]()
स्वातंत्र्याचा लढा उभारून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यानंतर देशाच्या प्रगतीबरोबरच समता, न्याय, बंधुता व धर्मनिरपेक्षता रुजविण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. सध्या राज्यात लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशाचा खरा इतिहास सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केले. काँग्रेस पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस शिक्षक सेलच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय संवाद शिबिरामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष प्रा. प्रकाश सोनावणे होते. पवार म्हणाले, आगामी काळात काँग्रेस अधिक सक्षमपणे लढणार असून काँग्रेसमध्ये नव्या कार्यकर्त्यांना सर्वात मोठी संधी आहे, त्यांनी कोणालाही न घाबरता पक्षात काम करावे असेही ते म्हणाले. प्रा. सोनावणे यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराबाबत मांडणी केली. एकूणच पैसे घेऊन होणारी शिक्षकांची भरती, कायम विनाअनुदनीत धोरण, शाळा बंद करण्याची सरकारचे धोरण, शिक्षकांच्या आत्महत्या, शिक्षण सेवक आणि शिक्षण सम्राटांचा मनमानी कारभार यामुळे शिक्षणाची झालेली अवस्था यावर भाष्य केले. सुरुवातीला शिक्षक सेलचे राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रा. सचिन दुर्गाडे यांनी शिक्षक सेलची सर्व उपस्थित शिक्षकांना माहिती दिली. यामध्ये शिक्षक सेल राज्यात कशाप्रकारे काम करतो याची ओळख करून दिली. सुरुवातीला उपस्थित शिक्षकांनी सध्याचे राजकारण, शिक्षण व काँग्रेस पक्षाची भूमिका यावर स्पष्टपणे चर्चा केली. यावेळी जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
Source link
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देशाचा खरा इतिहास सांगणे आवश्यक- पवार