![]()
पांडे साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार किंवा अनधिकृत साठेबाजी होऊ नये, यासाठी करमाळा तालुक्यातील घाऊक व किरकोळ साखर विक्रेत्यांच्या साठ्याची तपासणी मोहीम तालुका पुरवठा विभागाच्या वतीने राबवण्यात आली. अचानक करण्यात आलेल्या या तपासणीमुळे व्यापारी वर्गातही धावपळ पाहायला मिळाली. जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे व करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पथक प्रमुख तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी शत्रुघ्न चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दिव्यश्री ढोबळे, गणेश ताटे व उदय घोडगे यांनी तालुक्यातील विविध आस्थापनांना भेटी देऊन साखरेच्या उपलब्ध साठ्याची पाहणी केली. करमाळा शहरातील गुगळे जनरल स्टोअर, तिरुपती किराणा स्टोअर्स, सुशांती सुपर मार्केट, एस. व्ही. मार्ट यासह विविध ठिकाणी साखरेचा प्रत्यक्ष साठा किती आहे, याची तपासणी करण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांकडील साखरेच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी, उपलब्ध साठा व संबंधित कागदपत्रांची पाहणी करण्यात आली. साखरेची मागणी वाढली किंवा बाजारात तुटवडा जाणवला म्हणून काही व्यापाऱ्यांनी साखर लपवून ठेवू नये. साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून ग्राहकांना जादा दराने विक्री करणे, काळाबाजार करणे किंवा शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक साठा करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तसेच ग्राहकांना साखर योग्य दरात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावी, यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. साठ्याची योग्य नोंद ठेवावी आणि तपासणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Source link
साखरेचा काळाबाजार;करमाळ्यात तपासणी:जनरल स्टोअर्स, सुपर मार्केट, एसव्ही मार्टमध्येही पाहणी