![]()
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अहिल्यानगर मंडळातील तब्बल ३० हजार ४७५ वीज ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर रूफटॉप सोलर यंत्रणा बसवली असून, त्यातून ७२ मेगावॅ
.
महिन्याला ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी, तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देऊन उत्पन्न मिळवता यावे, या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. या योजनेची महावितरणकडून प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, ग्राहकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. अहिल्यानगर मंडळातील अहिल्यानगर ग्रामीण विभागात ३ हजार १२६, अहिल्यानगर शहर विभागात १४ हजार २५८, कर्जत विभागात ७६९, संगमनेर विभागात ६ हजार ७०४ आणि श्रीरामपूर विभागात ५ हजार ६१८ ग्राहकांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा निर्मिती होत आहे.
रूफटॉप सोलर प्रकल्प उभारणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान दिले जाते. एक किलोवॅट प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. हाउसिंग सोसायट्यांनाही ५०० किलोवॅटपर्यंतच्या प्रकल्पासाठी प्रतिकिलोवॅट १८ हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे. सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून महिन्याला सरासरी १२० युनिटपर्यंत वीज निर्मिती होऊ शकते. घरातील वीजवापरासाठी ही वीज वापरता येते. गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास वीजबिल कमी होण्यास किंवा शून्य येण्यास मदत होते. त्याचबरोबर अतिरिक्त वीज महावितरणच्या यंत्रणेत देता येत असल्याने ग्राहकांना आर्थिक फायदाही होतो.
नेट मीटर मोफत; १० किलोवॅटपर्यंत त्वरित मंजुरी रूफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना आवश्यक असलेले नेट मीटर मोफत बसवण्यात येत आहे. तसेच १० किलोवॅटपर्यंतच्या प्रकल्पांना त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. योजनेसाठी बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचा अधिकाधिक ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक अभियंता रमेशकुमार पवार यांनी केले आहे.