Headlines

हरिनाम, महाप्रसाद अन् मल्लांची कुस्ती; घोटणमध्ये परंपरेचा उत्सव




प्रतिनिधी |शेवगाव शेवगाव तालुक्यातील घोटण येथील प्राचीन श्री मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. सांगता सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते ११ या वेळेत संजय महाराज बिलवाल यांचे हरिकीर्तन झाले. त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. हरिकीर्तनानंतर भाविकांनी श्री मल्लिकार्जुनेश्वराचे दर्शन घेतले. सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित जंगी कुस्त्यांच्या हंगाम्याने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. आखाड्यात उतरलेल्या मल्लांनी विविध डावपेच व कौशल्याचे दर्शन घडविले. कुस्तीशौकिनांनी मल्लांना उत्स्फूर्त दाद दिली. पैठण-शेवगाव मार्गावरील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर धार्मिक श्रद्धेसोबत ऐतिहासिक व स्थापत्यवैभवाचा वारसा म्हणून ओळखले जाते. १३व्या-१४व्या शतकातील या मंदिराची रचना हेमाडपंती स्थापत्यशैलीशी संबंधित असल्याचे उल्लेख आहेत. कोरीव दगडी खांबांवरील हत्ती, घोडेस्वार योद्धे, मकरमुख, घाटपल्लव आदी शिल्पे आकर्षण ठरतात. पेशवेकाळात मंदिराची दुरुस्ती झाल्याचेही उल्लेख आढळतात. सांगता सोहळ्यानिमित्त दिवसभर खिचडी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. असंख्य भाविकांनी त्याचा लाभ घेतला. ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन, कुस्तीचा आखाडा आणि महाप्रसादामुळे मंदिर परिसरात भक्ती आणि ग्रामसंस्कृतीचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. घोटण येथील या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करून पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यास गावाला धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून नवी ओळख मिळू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *