![]()
शिरजगाव येथील महावितरणचे वीजतंत्री (लाईनमन) भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या आठ दिवसांत त्यांची बदली करण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी मोझरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांना निवेदन देत, ठोस कारवाई न झाल्यास कार्यालयासमोर ‘धडक आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, संबंधित लाईनमन गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नसून, वीज बिघाडाच्या वेळी फोन उचलत नाहीत, बरेचदा फोन बंदच ठेवतात. त्यामुळे गावात निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी वेळेत दूर होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गावातील विजेची कामे कंत्राटी कामगारांकडून करून घेतली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गावात वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू असून, मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून दुपारी १ वाजेपर्यंत वीज खंडित होती. याबाबत विचारणा केली असता लाईनमनकडून उद्धट व अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. शेतकरी व नागरिकांशी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याची तत्काळ बदली करून नवीन लाईनमनची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा, येत्या आठ दिवसांत मोठ्या संख्येने मोझरी येथील कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शरद देवघरे, शरद वाघ, सुभाष मालपे, सागर वाढोनकर, महादेव अंबुलकर, देवेंद्र तायवाडे, दिनेश जौंजाळकर, संतोष बेहरे, गंगाधर मनोहर, प्रशांत डोंगरे, सुमेध भोगे, प्रकाश मेश्राम, अमरदीप वाघमारे, गंगाधर भालेराव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दोषी आढळल्यास योग्य ती प्रशासकीय कारवाई वीज पुरवठ्यातील अनियमितता व लाईनमन संदर्भातील प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. वरिष्ठांना यासंदर्भात लेखी अहवाल पाठवण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल. नागरिकांना सुरळीत वीज सेवा देणे ही आमची प्राथमिकता असून, तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मनीषा सांभारे, सहाय्यक अभियंता, महावितरण.
Source link
शिरजगावात वीज कर्मचाऱ्याविरोधातसंताप; बदली न केल्यास आंदोलन:लाईनमविरोधात सहाय्यक अभियंता मनीषा चाभारेंना दिले निवेदन