Headlines

शिरूरमध्ये 250 किलो गांजा जप्त, दोघांना अटक:एक्सयूव्ही 700 आणि दोन मोबाईलसह 1.51 कोटींचा मुद्देमाल जप्त; आरोपी अमरावतीचे




पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शिरूर येथे मोठी कारवाई करत तब्बल २५० किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मोटार आणि दोन मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले आहेत. एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त हसन गौर यांनी दिली आहे. समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४) आणि अजय जगदीश मोहिते (वय ३०, दोघेही रा. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. समीर हा पेव्हर ब्लॉकचे काम करतो, तर अजय फर्निचरचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर येथील दत्त मंदिराजवळील स्टेट बँक कॉलनीतील सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थांची अवैध विक्री, वाहतूक आणि तस्करी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक दोनने ही कारवाई केली. पोलिसांनी जप्त केलेल्या २५० किलो गांजाची किंमत १ कोटी २५ लाख रुपये आहे. तसेच २५ लाख रुपये किमतीची एक्सयूव्ही ७०० आणि एक लाख २० हजार रुपये किमतीचे सॅमसंग व ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण, नितीनकुमार नाईक आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *