Headlines

शेडची भिंत कोसळून कळंकीत एकाचा मृत्यू:शेडमध्ये चाराकुट्टी भरताना घडली दुर्घटना




तालुक्यातील कळंकी येथे शेतातील शेडची भिंत अंगावर कोसळून संजय बाबूराव थोरात (५०) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेमुळे कळंकी गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कळंकी येथील हिंगणमळी शिवारातील गट क्रमांक ८१ मध्ये संजय बाबूराव थोरात यांचे शेत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे जनावरांसाठी चारा साठवून ठेवण्याच्या उद्देशाने ते आपल्या कुटुंबीयांसह शेतात बांधलेल्या शेडमध्ये चाराकुट्टी भरण्याचे काम करत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक शेडची कच्ची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली ते गंभीररीत्या दबले गेले. अपघाताचा आवाज ऐकताच कुटुंबीय व आसपासच्या शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन त्यांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या संजय थोरात यांना तातडीने उपचारासाठी कन्नड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा कळंकी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मृत संजय थोरात यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शेती करणाऱ्या या शेतकरी कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबीय उघड्यावर पडले आहेत. कुटुंबाला प्रशासनाकडून शासकीय आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *