Headlines

शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे‎:पैठण तालुक्यात यंदा पावसाच्या खंडामुळे अर्थव्यवस्थेला फटका




गेल्या महिनाभरापासून पावसाने मारलेल्या दडीमुळे पैठण तालुका आणि लगतच्या ग्रामीण भागातील शेती संकटात सापडली असून, त्याचा थेट आणि गंभीर परिणाम संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. शेतमालाचे अपेक्षित उत्पादन, शेतीतील पुढील कामे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत तीव्र अनिश्चितता निर्माण झाल्याने ग्रामीण भागातील बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पावसाअभावी निर्माण झालेल्या या मंदीची झळ आता किराणा, कपडे, कृषी साहित्य, इलेक्ट्रॉनिक्स, हॉटेल व्यवसाय, दुचाकी दुरुस्ती आणि विविध सेवा क्षेत्रांपर्यंत सर्वांनाच पोहोचायला सुरुवात झाली आहे. पैठण तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आणि मुख्य आधार शेती हाच आहे. दरवर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला की ग्रामीण व शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीला मोठा वेग येतो. परंतु, यंदा ऐन वाढीच्या काळातच पावसाने ओढ दिल्याने पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अत्यावश्यक खर्च वगळता इतर सर्व प्रकारचे खरेदीचे निर्णय पुढे ढकलताना दिसत आहेत. याचा फटका पैठण शहरातील शुक्रवारच्या पारंपरिक आठवडीबाजारासह परिसरातील स्थानिक दुकानांनाही बसला आहे. बाजारात ग्राहकांची पावले मंदावली असून व्यवहारांची गती कमालीची घटली आहे. कपडे, घरगुती साहित्य, शेतीची अवजारे, मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री घटली आहे. याशिवाय, हॉटेल व्यवसाय आणि दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजमधील कामेही थंडावली आहेत. शेतमालाच्या विक्रीतून निर्माण होणारा पैसा जेव्हा गावात फिरतो, तेव्हाच इतर छोटे-मोठे व्यवसाय चालतात. हे मूळ आर्थिक चक्रच थांबल्याने व्यापारी वर्ग चिंतेत सापडला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता राहिला आणि तो बाजारात आला, तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकते. उत्पादन घटण्याची भीती, पावसाचा खंड असाच लांबल्यास खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्पादन घटल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडणार असून, आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी अधिक अडचणीत येईल. पावसाअभावी शेतीची कामे ठप्प झाल्याने कृषी सेवा केंद्रांमधील खते व बियाणे विक्रीवरही परिणाम झाला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *