![]()
सहकारी साखर कारखान्यांना बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पाठबळ महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनविण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने केंद्र सरकारच्या गोबर्धन योजनेंतर्गत प्रतिदिन १६ टन क्षमतेचा बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत झाला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे, उपाध्यक्ष सोपान शिरसाठ, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर उपस्थित होते. यावेळी अण्णासाहेब म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळ सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा धनादेश शासनाकडे सुपूर्द करण्यात आला. मंत्री विखे म्हणाले, विखे पाटील कारखान्याने बायो-सीबीजी प्रकल्प उभारण्याचा धाडसी आणि दूरदृष्टीचा निर्णय घेतला आहे. ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शेतातील वाया जाणाऱ्या कचऱ्याचा उपयोग करून या प्रकल्पातून ऊर्जा निर्मिती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
शेतातील कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती:विखे कारखान्याचा बायो-सीबीजी प्रकल्प