![]()
वरखेडी तांडा (ता. सोयगाव) शिवारात शेत राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर रात्री बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. जखमी शेतकऱ्यावर जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. वरखेडी तांडा येथील शेतकरी ज्ञानेश्वर वामन लहाने (४२) यांची वरखेडी शिवारात गट नंबर ६७ मध्ये शेती आहे. त्यांनी शेतात कपाशी व केळी पिकाची लागवड केली आहे. त्यांनी शेतात बखार बांधली आहे. तेथेच ते जनावरे बांधतात. रात्री ते शेत व जनावरे राखण्यासाठी शेतातच झोपतात. सोमवारी ते घरून जेवण करून शेत व जनावरे राखण्यासाठी गेले होते. शेतात झोपलेले असताना ११ वाजेच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. शेजारील शेतात झोपलेले शेतकरी धावून गेल्याने बिबट्या तेथून पसार झाला. या हल्ल्यात ज्ञानेश्वर लहाने यांच्या तोंडाला गंभीर जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी पहूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. पुढील उपचारासाठी त्यांना जळगाव येथे हलवले.
Source link
शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर रात्री बिबट्याने केला हल्ला:सोयगाव तालुक्यातील शिवारात वरखेडी तांडा येथील घटना