Headlines

शेवगाव तहसीलमध्ये अस्वच्छतेचा रामभरोसे कारभार:कर्मचाऱ्यांकडूनच ‎गुटख्याची रंगरंगोटी‎




शेवगाव तहसील कार्यालयात सध्या स्वच्छतेच्या नियमांची ऐशीतैशी होताना दिसत आहे. ज्या प्रशासनाने ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवायचे, त्याच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. विशेष म्हणजे, दिव्यांगांसाठी बनवलेला रॅम्प कचराकुंडी बनला असून, कार्यालयातील भिंती गुटखा-माव्याच्या पिचकाऱ्यांनी लालभडक झाल्या आहेत. या अस्वच्छतेमागे बाहेरील व्यक्तींपेक्षा स्वतः कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवेशद्वाराजवळील रॅम्पवर प्लास्टिक पिशव्या, रिकाम्या बाटल्या आणि कागदाचे तुकडे आदींचा साचला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. एकीकडे शासन ‘दिव्यांग-स्नेही’ धोरणाच्या गप्पा मारते, तर दुसरीकडे त्याच दिव्यांगांच्या मार्गात कचऱ्याचे अडथळे उभे केले जात आहेत. “तहसील कार्यालयात रक्षकच भक्षक झाले आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया आदर्श गाव वाघोली येथील उमेश भालसिंग यांनी दिली. त्यांच्या दाव्यानुसार, काही अधिकारी स्वतःच्या दालनातच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. इतकेच नाही तर, “बाहेर जात असशील तर माझ्यासाठीही पान-मावा घेऊन ये,” अशा सूचना काही अधिकाऱ्यांकडून दिल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.यापूर्वी तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या असीमा मित्तल यांनी अस्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई करून घेण्याची शिक्षा दिली होती. त्यांच्या या धाकामुळे कार्यालयाचा परिसर चकाचक राहत असे. मात्र, सध्याच्या प्रशासकीय सुस्तपणामुळे शिस्त कोलमडली असून, पुन्हा एकदा अशाच कठोर कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आणि कचरा टाकणे हा गुन्हा आहे, हे नागरिकांना शिकवणारे अधिकारीच पिचकाऱ्या मारत असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा? सध्याच्या तहसीलदारांनी तातडीने याकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उमेश भालसिंग यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *