Headlines

श्रीगोंद्यात पावसाची उघडीप, पिकांच्या खुरपणीने घेतला वेग:तालुक्यातील विहीरींच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने शेतकरी वर्गात मात्र चिंता‎




तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने पुन्हा पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाच्या उघडिपीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या खुरपणीच्या कामांना वेग दिला असून सध्या शेतशिवारात मजुरांसह शेतकरी खुरपणी करताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. यंदाच्या हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, तूर, मका, कपाशी, कांदा तसेच जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची पेरणी व लागवड केली आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच झालेल्या पावसामुळे पिकांसोबत गाजरगवत व इतर तणांचीही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होण्यासाठी शेतकरी आता खुरपणी व तणनियंत्रणाच्या कामात व्यस्त झाले आहेत. कुकडी लाभक्षेत्रात तूर, उडीद, बाजरी, मका आणि कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. विशेषतः कपाशी हे नगदी पीक असल्याने तीन ते साडेतीन महिन्यांत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पिकांच्या भवितव्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम आहे. पाऊस पुन्हा सुरू होईल, या आशेवर शेतकरी पिकांच्या निगेची कामे करत आहेत. यावर्षीचा उन्हाळा अतिशय तीव्र ठरल्याने तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. बारमाही सिंचनासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुकडी व घोड लाभक्षेत्रातही उन्हाळ्याच्या अखेरीस पाण्याची टंचाई जाणवली. अनेक शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे जोपासलेल्या फळबागा वाचविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. कुकडी कालव्याचे उन्हाळी आवर्तन वेळेत न मिळाल्याने उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. रोहिणी नक्षत्रात पावसाची सुरुवात झाली असली, तरी मृग नक्षत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नाही. परिणामी ओढे, नाले आणि बंधारे पूर्ण क्षमतेने वाहिले नाहीत. विहिरी आणि कूपनलिकांमधील पाणीपातळीही अपेक्षेइतकी वाढलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून राहिला आहे. कुकडीच्या पाण्याचे आवर्तन वेळेत सोडण्यात यावे, जेणेकरून उन्हाळी हंगामातील पिकांचे नुकसान टाळता येईल, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहेत. शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना सिंचनाच्या प्रश्नात प्रशासनाने संवेदनशील भूमिका घेऊन ठोस निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *