Headlines

श्री विसर्जनावेळी बुडून सात, तर ट्रॅक्टरखाली येऊन एकाचा मृत्यू:नाशिक, धुळे, परळी, परभणी आणि पुण्यात उत्साहाला गालबोट




राज्यात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन पार पडले. मात्र, विविध ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे या उत्साहाला गालबोट लागले आहे. पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने नाशिक, धुळे, परळी, परभणी, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात तब्बल सात तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, पुण्यात चालत्या ट्रॅक्टरवर चढताना तोल जाऊन चाकाखाली आल्याने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यवतमाळमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिघांना वाचवण्यात यश आले आहे. नाशिकच्या विल्होळी परिसरातील बंद खाणीमध्ये विसर्जनासाठी गेलेला संदीप खनपटे (२२, रा. चुंचाळे) हा युवक दलदलीत बुडाला. शनिवारी दुपारी त्याचा उर्वरित. मृतदेह सापडला. धुळे तालुक्यातील फागणे येथील काळाडोह नाल्यात ओम ऊर्फ गणेश शिंदे (१६) याचाही खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. विदर्भात दोघांचा मृत्यू : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पैनगंगा नदीवर मूर्ती विसर्जनावेळी चार जण बुडू लागले. नागरिकांनी तत्परता दाखवत तिघांना बाहेर काढले. मात्र, हरीश हरणे (१७) याचा बुडून मृत्यू झाला. तसेच, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील सुमित मारोडकर (१९) या तरुणाचा बेंबळा नदीत बुडून मृत्यू झाला. मराठवाड्यात तिघांचा मृत्यू, एक सुखरूप परळी तालुक्यातील कौठाळी येथील तलावात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेला आदिनाथ भाऊराव जाधव (२१) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील धानोरा काळे (ता. पूर्णा) येथे गोदावरी नदीपात्रात उतरलेले मंजाजी अश्रोबा घोरपडे (१७) आणि गजानन रामदास घोरपडे (१९, दोघे रा. पालम) हे दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात बुडाले. त्यांच्यासोबत असलेला माउली घोरपडे हा तरुण सुखरूप बाहेर आला. चालत्या ट्रॅक्टरखाली येऊन तरुणाचा मृत्यू पुण्यात विसर्जन मिरवणुकीनंतर परतणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागे धावत ट्रॅक्टरवर चढण्याचा प्रयत्न विघ्नेश संतोष पवार (२०, रा. रामटेकडी) याने केला. मात्र, तोल जाऊन तो खाली पडला आणि ट्रॉलीचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. बी. टी. कवडे रस्त्यावर घडलेल्या या घटनेत विघ्नेशला ससून रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असुरक्षित विसर्जन स्थळांवर प्राणहानी विसर्जनावेळी बहुतांश बुडण्याच्या घटना या अधिकृत आणि गर्दीच्या विसर्जन स्थळांऐवजी नद्या, नाले आणि बंद खाणींमध्ये घडल्या आहेत. अशा ठिकाणी प्रशासनाचे जीवरक्षक तैनात नसतात आणि पाण्याचा तळ दलदलीचा असतो, ज्यामुळे तरुण गाळात अडकतात आणि त्यांचा मृत्यू होतो. त्यामुळे विसर्जन सुरक्षित स्थळी करणे गरजेचे आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *