![]()
अधिकमासाच्या पुण्यपर्वात येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिर भक्तिभावाने फुलून गेले होते. या पवित्र महिन्यात गोदावरीत स्नान, संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन आणि दानपुण्याच्या भावनेने आलेल्या लाखो भाविकांनी मंदिरातील दानपेटीत ३० लाख रुपयांपेक्षा अधिक देणगी अर्पण केली. एका महिन्यात जमा झालेली ही रक्कम नाथ संस्थानच्या इतिहासातील देणग्यांपैकी एक मानली जात आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष आमदार विलास भुमरे यांनी दिली. अधिकमास हा हिंदू धर्मात पुण्यदायी मानला जातो. या काळात तीर्थस्नान, जप-तप, दानधर्म आणि संतदर्शनाला महत्त्व असते. पैठण येथून वाहणारी गोदावरी नदी दक्षिणवाहिनी असल्याने तिला ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखले जाते. अधिकमासात या पवित्र नदीत स्नान करून संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यास विशेष पुण्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून आणि परराज्यांतून ३२ लाखांपेक्षा जास्त भाविकांनी पैठण नगरीत हजेरी लावली. दररोज पहाटेपासूनच गोदावरी घाट, नाथ मंदिर परिसर आणि समाधीस्थळावर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकरी, कष्टकरी, वारकरी, महिला आणि सर्वसामान्य भक्तांनी दिलेल्या या योगदानातूनच हा मोठा निधी उभा राहिल्याचे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे व शहादेव लोहारे यांनी सांगितले. या गर्दीमुळे गोदावरी घाट, मुख्य मंदिर आणि शहरातील प्रमुख धार्मिक स्थळांवर महिनाभर मोठी वर्दळ होती. याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला झाला. फुलविक्रेते, प्रसाद विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, लॉज, वाहन चालकांना आर्थिक आधार मिळाला. पैठणच्या अर्थचक्राला गती मिळाल्याचे व्यापारी महासंघाचे पवन लोहिया यांनी सांगितले. जास्त अधिकमास संपल्यानंतर आमदार विलास भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील दानपेट्या उघडण्यात आल्या. नोटा आणि नाण्यांचे प्रमाण जास्त असल्याने मोजणीची प्रक्रिया तासन्तास सुरू होती. संस्थानचे कर्मचारी, बँक प्रतिनिधी आणि विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी पारदर्शक व काळजीपूर्वक या दानाची मोजणी केली. भाविकांच्या गर्दीसाठी सुरक्षा, दर्शन व्यवस्था व स्वच्छतेचे विशेष नियोजन करण्यात आले होते.
Source link
संत एकनाथ महाराज मंदिरास 30 लाख देणगी:अधिकमास महिन्यात राज्यभरातील 32 लाख भाविकांनी घेतले दर्शन