Headlines

सदाभाऊ खोतांचे दिल्लीतील आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य:आंदोलनकर्त्यांना दहशतवाद्याची उपमा, म्हणाले – या आतंकवाद्यांना लोकशाही मार्गाने उत्तर द्या




दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केले आहे. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट ‘आतंकवाद्यांशी’ करत, “या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जोरदार पाठराखण केली. ते म्हणाले, “देशात ‘नीट’ परीक्षेवरून जो काही गोंधळ उभा केला जात आहे, त्यामागे एक मोठे षडयंत्र आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना प्रशासनाने पकडले असून वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे.” धमेंद्र प्रधानांचा राजीनामा मुळीच घेऊ नये सदाभाऊ खोत म्हणाले, “जे विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, ते सध्या वैद्यकीय प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. मात्र, ज्यांचा या संपूर्ण प्रक्रियेशी काहीही संबंध नाही, ते लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा थेट कोणताही संबंध नाही, त्यामुळे केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा मुळीच घेऊ नये.” सरकारविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा दावा या आंदोलनाच्या आडून देशात आणि राज्यात सरकारविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला. “इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी केंद्र तसेच राज्यातील महायुती सरकारविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सातत्याने असत्य माहिती पसरवत आहेत,” असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. ‘मविआ’ आणि जयंत पाटलांच्या समर्थकांवर गंभीर आरोप “महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनाशी आमचा संबंध नाही असे वरकरणी सांगतात. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा ग्रुप चालवणारा एक ट्रोलर या संपूर्ण प्रकरणात राज्यात अशांतता माजवण्याचे काम करत आहे. सोशला मीडियावरील ‘आय लव्ह जयंत पाटील’ या पेजच्या माध्यमातून या आंदोलनात तेल ओतून आगीत भर घालण्याचा प्रकार सुरू आहे,” असा गंभीर आरोप खोत यांनी केला. आंदोलनकर्त्यांना आतंकवाद्याची उपमा आंदोलकांवर सडकून टीका करताना सदाभाऊ खोत यांची जिभ घसरली. त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना “केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्र आहेत,” अशी घोषणा दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की, “इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी आंदोलनाच्या नावाखाली देशात आतंकवादासारखी परिस्थिती निर्माण करू पाहात आहेत. या आंदोलकांच्या रूपाने उघड्या पडणाऱ्या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाहीच्या मार्गानेच चोख उत्तर दिले पाहिजे.” सदाभाऊ खोत यांच्या या ‘आतंकवादी’ या शब्दाच्या वापरामुळे विरोधी पक्षांसह आंदोलनकर्त्यांकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला जात असून, सदाभाऊ खोत यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. सदाभाऊ खोतांच्या विधानावर राजू शेट्टींचा घणाघात दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ‘आतंकवादी’ म्हणणाऱ्या शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कडक शब्दांत समाचार घेतला आहे. ते म्हणाले, “मावळच्या शेतकऱ्यांचे जे आंदोलन झालेले होते आणि त्यावेळी खोतांनी केलेली स्वतःची भाषण स्वतः ऐकून घ्यावी. त्यावेळी पाण्याचा अधिकार मागणाऱ्या शेतकऱ्यांवर जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी तिथ मीच सदाभाऊ गोत तिथे पाठवल होत. त्यावेळी त्यांची भाषण आठवून बघावी आणि मग आता या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या बाबतीत किंवा सर्वसामान्य जनतेच्या पोरांच्या बाबतीत वक्तव्य करावं.” पेपर फोडणारे लोक भाजप-आरएसएसशी संबंधित राजू शेट्टी म्हणाले, “मी दिल्लीतच आहे अवघ्या देशातली सगळी तरुण पोरं इथे जमलेली आहेत आणि त्यांची काय मागणी आहे? नीटचा पेपर असून दे किंवा महाराष्ट्रातल टीईटीचा पेपर असून दे हे फोडणारे लोक कोण आहेत हे लोक भाजप आणि आरएसएस संबंधित असणारे सगळे लोक आहेत. आज देशातला विद्यार्थी लढतोय. खरंतर त्याच्या मागे उभा राहिला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांची नैतिक जबाबदारी आहे. कालच्या घटनेवरून मोदींना लाच वाटली पाहिजे राजू शेट्टी म्हणाले, “यापूर्वी भाजपने कितीतरी वेळा असे काही कांड झाल्यानंतर राजीनामा मागितलाय, ते ही आठवून बघावे. त्यांनी टूजी स्पेक्ट्रमच्या वेळी मनमोहन सिंगांचा राजीनामा मागितला नव्हता का? त्यांनी कोळसा घोटाळ्याच्या वेळी संसद बंद पाडली नव्हती का? भाजपने जे विरोधी पक्षामध्ये असताना केले, तेच आता देशातले विद्यार्थी करता आहेत. याला जबाबदार असणाऱ्या धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्या ही मागणी करतात. धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा जर घेता येत नसेल तर मोदीनी राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने काल दिल्लीमध्ये रक्तपात झाला, अगदी लहान लहान मुलींना सुद्धा मारल गेले, त्यांचे कपडे फाडले गेले. खरंतर नरेंद्र मोदीना सुद्धा याची लाज वाटली पाहिजे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *