Headlines

सह्याद्री नष्ट करणारं हे मानवी राक्षसांचं सरकार:कर्जत वृक्षतोडीवरून संजय राऊतांचा सरकारवर घणाघात, म्हणाले- ही लढाई थांबणार नाही




कर्जत तालुक्यातील टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरून विरोधक आक्रमक झाले असून, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्य सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. “दोनशे वर्षे वयाची झाडे ज्या निर्दयीपणे कापली जात आहेत, हे कृत्य एखादा मानवी राक्षसचं करू शकतो, आणि हे सरकार अशाच मानवी राक्षसांचे आहे,” असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ‘३३ हजार झाडं तोडणं म्हणजे जंगल नष्ट करणं’ संजय राऊत म्हणाले, “आम्ही पाहिलेल्या आकड्यानुसार आतापर्यंत २ ते ३ हजार झाडे तोडण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात हे सरकार ३३ हजार झाडे तोडणार आहे. ३३ हजार झाडे तोडणे म्हणजे संपूर्ण जंगल नष्ट करण्यासारखेच आहे. येथून भीमाशंकर अभयारण्य केवळ २० किलोमीटरवर आहे, तरीही ही निर्दयी कत्तल सुरू आहे.” ‘आई फक्त भाजप आणि टोरेंटच्या मालकांनाच आहे का?’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ या मोहिमेबाबत राऊत म्हणाले, हे शाही जंगल आहे आणि इथली जल, जमीन, जंगल ही आदिवासींची संपत्ती आहे. मोदी म्हणतात ‘एक पेड माँ के नाम’, मग त्या आदिवासी आणि कातकऱ्यांची जी झाडे तोडली जात आहेत, त्यांना आई नाहीये का? की आई फक्त भाजप आणि टोरेंट कंपनीच्या मालकांनाच आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘वनौषधींचा ठेवा नष्ट होतोय’ स्थानिकांच्या माहितीनुसार राऊत म्हणाले, “या जंगलात सर्पदंश किंवा विंचू चावल्यानंतर विष उतरवण्यासाठी लागणाऱ्या अनेक वनौषधी आहेत. लोक पिढ्यानपिढ्या या औषधींनी माणसांचे जीव वाचवत आले आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी ही परवानगी देऊन शहा-मेहतांच्या ताब्यात अख्खे जंगल दिले आहे. हे सगळं नष्ट केलं जात आहे.” ‘सह्याद्री नष्ट करायचा आणि विरोध केल्यास बंदुका रोखायच्या’ सरकारच्या दडपशाहीवर टीका करताना ते म्हणाले, “महाराष्ट्रातील जंगले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीच्या रांगा नष्ट करायच्या आणि शहा-मेहतांचे खिसे भरायचे, असा हा प्रकार आहे. शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी विरोध केला तर त्यांच्यावर बंदुका रोखल्या जात आहेत. हजारो पोलीस ग्रामस्थांना मारण्यासाठी आणि दडपशाही करण्यासाठी तिथे तैनात आहेत.” ‘लढाई थांबणार नाही, देशभरातून पर्यावरणवादी येतील’ पुढील संघर्षाची दिशा स्पष्ट करताना राऊत म्हणाले, “काल आमचे, आदित्य ठाकरे यांचे आणि गावकऱ्यांचे बोलणे झाले आहे. ही लढाई आता थांबणार नाही. देशभरातील निसर्गप्रेमी आणि पर्यावरणवाद्यांनी आमच्याशी संपर्क साधला असून, तेही आता या लढ्यात सहभागी होण्यासाठी तिथे येतील.”
————– हेही वाचा.. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात: महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी? पहिला कल कोणाच्या बाजूने?
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या चुरशीच्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत पहिले कल हाती येण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने आपली पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली असून, कुणाला धक्का बसणार आणि कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *