Headlines

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील 'हिरकणी' अखेर सुरक्षित!:10 दिवसांच्या चिंतेनंतर वन विभागाला मोठा दिलासा, मात्र गळ्यातील 'सॅटेलाइट पट्टा' बेपत्ता




सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध ‘हिरकणी’ (STR T6) वाघिणीच्या सुरक्षेबाबत गेल्या 10 दिवसांपासून निर्माण झालेली चिंता अखेर मिटली आहे. वन्यजीव विभागाने लावलेल्या स्वयंचलित कॅमेऱ्यात हिरकणी नुकतीच कैद झाली असून, ती अत्यंत सुदृढ स्थितीत असल्याची आनंददायी माहिती समोर आली आहे. मात्र, तिच्या गळ्यातील उपग्रह संचलित स्थानदर्शक पट्टा (सॅटेलाइट जीपीएस कॉलर) गायब झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ​मागील 10 दिवसांपासून हिरकणीच्या स्थानदर्शक पट्ट्याकडून मिळणारे संकेत एकाच ठिकाणाहून येत होते. संकेतांच्या स्थानामध्ये कोणताही बदल होत नसल्याने वन्यजीव विभागात चिंतेचे वातावरण पसरले होते. वाघिणीला काही इजा तर झाली नाही ना, या शक्यतेने वन विभागाने तात्काळ आपल्या गस्ती पथकांमध्ये वाढ केली. पथकांनी अत्यंत दुर्गम आणि मोठा परिसर पिंजून काढला, परंतु स्थानदर्शक पट्टा असूनही तिचा ठावठिकाणा लागत नव्हता. पट्ट्यामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने तो गळून पडला असावा, अशी शंका आल्याने वन्यजीव विभागाने तातडीने आपली रणनीती बदलली. जंगलातील स्वयंचलित कॅमेराची संख्या वाढवण्यात आली आणि त्यातील चित्रफितींचे अतिशय बारकाईने विश्लेषण सुरू करण्यात आले. ​छायाचित्रमुळे दिलासा ​रविवारी, कोयनेच्या जंगलातील मुख्य कोअर क्षेत्रात एक वाघीण फिरताना स्वयंचलित कॅमेऱ्यात टिपली गेली. वन्यजीव विभागाने जेव्हा तिच्या अंगावरील पट्ट्यांचे जुन्या नोंदींशी आणि माहितीशी विश्लेषण केले, तेव्हा ती दुसरी कोणी नसून ‘हिरकणी’ असल्याचे स्पष्ट झाले. ​पट्टा गायब असण्याचे कारण काय? कॅमेरा चित्रित झालेल्या फोटोद्वारे हिरकणीच्या गळ्यात तो पट्टा दिसलेला नाही. याबाबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी सांगितले की, “हिरकणीच्या गळ्यात तो पट्टा दिसत नाही यामागे दोन मुख्य कारणे असू शकतात. एकतर तिने स्वतःच्या पंजाने तो ओढून काढून टाकला असावा, किंवा काही तांत्रिक बिघाडामुळे तो गळून पडला असण्याची शक्यता आहे.” ​विशेष म्हणजे, तो पट्टा अजूनही चालू असून त्याचे संकेत अधूनमधून वन विभागाला मिळत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ​तब्येत सुदृढ, वजनही वाढले! ​हिरकणीच्या केवळ छायाचित्रमुळे नव्हे, तर तिच्या शारीरिक स्थितीने वन्यजीव तज्ज्ञांना मोठा दिलासा दिला आहे. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी यावर अधिक माहिती देताना सांगितले की, “मिळालेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओ क्लिपच्या विश्लेषणावरून ‘STR T6’ हिरकणी वाघीण एकदम सुदृढ दिसत आहे. प्रथमदर्शनी तिचे वजनही वाढल्याचे जाणवत असून, ती जंगलात पूर्णपणे सुरक्षित आणि सक्रिय आहे.” 7 फेब्रुवारी 2026 रोजी विदर्भातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणलेली ही वाघीण सह्याद्रीमध्ये आणली होती. तिला सह्याद्रीव्याघ्र प्रकल्पाच्या कोयना मधील कोअर भागात STR T6 हिरकणी वाघिणीस निसर्ग मुक्त करण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *