Headlines

साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच नाही:गरज असल्यास महाराष्ट्राबाहेर जातो, रमेश म्हात्रेंकडून कोर्टाला विनवणी




डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी विनंती केली. ‘आपण सध्या तुरुंगात असल्याने पीडित आणि साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, तसेच पोलिसांचा तपासही बहुतांश पूर्ण झाला आहे. त्यामुळे आवश्यकता वाटल्यास चार-सहा आठवडे राज्याबाहेर राहण्याची अट घालून जामीन मंजूर करावा,’ असा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, या गुन्ह्यात मूळ तक्रारदार डॉक्टरकडून आरोपींची ओळखपरेड अद्याप बाकी असून पोलिसांना काही साक्षीदारांचे जबाब व आणखी पुरावे गोळा करायचे आहेत, या बाबींची दखल घेत उच्च न्यायालयाने त्यांना तातडीने जामीन देण्यास नकार दिला. तसेच, या जामीन अर्जावर आता 6 ऑगस्ट रोजी पुढील विचार केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून जामीन अर्जाला विरोध या सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने मूळ तक्रारदार डॉ. वैभव साळुंखे यांच्यासह अन्य पीडित व साक्षीदारांना संरक्षण देण्याचे निर्देश सरकारला दिले. यावेळी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ वकील एस. यू. कामदार यांनी आरोपी रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला. म्हात्रे यांच्या या कृतीमुळे पालिका रुग्णालयातील इतर डॉक्टरांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली असून, यापूर्वीही अशा अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी साक्षीदारांवर दबाव टाकून निर्दोष मुक्तता मिळवली आहे. तसेच सध्याही त्यांच्याकडून पीडित व साक्षीदारांवर दबाव टाकला जात आहे, असा जोरदार युक्तिवाद ॲड. कामदार यांनी खंडपीठासमोर केला. म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांचा युक्तीवाद आरोपी रमेश म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना जामिनाची जोरदार मागणी केली. “माझ्याकडून साक्षीदारांना धमक्या जाण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही. तसेच, तपासावर कोणताही प्रभाव पडू नये यासाठी गरज भासल्यास पुढील चार ते सहा आठवड्यांसाठी राज्याबाहेर राहण्याची माझी तयारी आहे. त्यामुळे हा तपास सुरू असताना मला जामीन मंजूर करण्यात यावा,” अशी भूमिका म्हात्रे यांनी आपल्या वकिलांमार्फत खंडपीठासमोर मांडली. दुसरीकडे, सरकारच्या वतीने महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी पोलिसांच्या तपासाची सद्यस्थिती आणि पुढील दिशा न्यायालयासमोर स्पष्ट केली. न्यायालयाच्या आदेशानुसार आता पोलिस उपायुक्तांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून आतापर्यंत तब्बल 26 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त आणखी काही साक्षीदारांचे जबाब नोंदवणे, आरोपींच्या आवाजाचे नमुने घेणे आणि पीडितांनी दिलेले व्हिडीओ फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवणे यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया येत्या दोन आठवड्यांत पूर्ण केल्या जातील. तसेच, मूळ तक्रारदार डॉ. साळुंखे यांना चोख पोलिस संरक्षणात डोंबिवलीत आणून आरोपींची ओळख परेडही पूर्ण केली जाईल, अशी महत्त्वपूर्ण ग्वाही पोलिसांच्या वतीने देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *