Headlines

साडेचारशे वर्षांची परंपरा:पैठण येथील नाथ मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात, अष्टमी ते द्वादशीपर्यंत चालेल हा उत्सव‎




संत एकनाथ महाराजांची पावन भूमी असलेल्या पैठणनगरीत तब्बल साडेचारशे वर्षांची गौरवशाली परंपरा असलेला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा यावर्षीही अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. गावातील ऐतिहासिक नाथ मंदिरात श्रीकृष्णाचा हा जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी ते द्वादशी अशा सलग पाच दिवसांपर्यंत मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. संत एकनाथ महाराजांच्या अपार आणि निष्काम भक्तीमुळे खुद्द भगवंताने श्रीखंड्या रूप धारण करून महाराजांच्या वाड्यातील रांजणात पाणी भरले होते, असा ऐतिहासिक व धार्मिक उल्लेख आढळतो. याच अनन्यसाधारण भक्तीचे प्रतीक म्हणून दरवर्षी हा जन्मोत्सव नाथ मंदिरात मोठ्या उत्साहात होतो. ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी जन्मोत्सव दिनी नाथ वंशजांच्या हस्ते भगवान विजय पांडुरंगाच्या मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. रात्री महाभजन आणि बरोबर १२ वाजता हजारो भाविकांच्या जयघोषात श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला. ५ सप्टेंबर शनिवार रोजी नाथ वंशज व पैठण शहरातील भाविकांच्या अलोट उत्साहात ‘काला’ व दहीहंडी फोडण्यात आली. त्यानंतर नाथ मंदिरात दिंडी प्रदक्षिणा आणि नाथ वंशजांचे भावपूर्ण हरिकीर्तन रंगले. ६ सप्टेंबर रविवार रोजी संपूर्ण पैठण शहरातील भाविकांसाठी भव्य महाप्रसाद व महापंगतीचे आयोजन करण्यात आले आहे. ७ सप्टेंबर सोमवार रोजी एकादशीनिमित्त विजय पांडुरंगाचा अभिषेक व सायंकाळी ७ वाजता पारंपरिक चक्रीभजनाचा कार्यक्रम होईल. ८ सप्टेंबर मंगळवार रोजी लळिताच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता होईल. या दिवशी भजन, कीर्तनासह शेवगावचे प्रख्यात भारुडकार सय्यद हामिद भातकुडगावकर यांच्या भारुडाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सागवानी कोरीव मखर ठरले मुख्य आकर्षण यावर्षीच्या उत्सवात सागवानी लाकडापासून अत्यंत बारीक व नयनरम्य कोरीव काम केलेले मखर भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. खामगाव येथील चार कारागिरांनी अहोरात्र मेहनत घेऊन हे मखर पूर्ण केले आहे. मखरावर संत एकनाथ महाराजांच्या काळातील पारंपरिक नक्षीकामाचा वापर करण्यात आल्यामुळे हे मखर साडेचारशे वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक वैभवाची आठवण करून देते, अशी माहिती नाथ वंशज चैतन्य बुवा गोसावी, श्रीनाथ बुवा गोसावी व प्रवीण बुवा गोसावी यांनी दिली. आकर्षक फुलांची सजावट आणि हे लाकडी मखर यामुळे मंदिर परिसर नटला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *