Headlines

30 दिवसांपासून पावसाची दडी:सोयगाव तालुक्यात पावसाअभावी 41 हजार हेक्टरवरील पिके संकटात, पिके धोक्यात, पोळ्यावर दुष्काळाचे सावट‎




सोयगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांवर पाण्याचा तीव्र ताण निर्माण झाला आहे. सध्या कपाशी पिकाला फुले आणि बोंडे लागण्याची संवेदनशील आणि महत्त्वाची अवस्था सुरू आहे. मात्र, ऐन गरजेच्या वेळीच पावसाने दांडी मारल्याने जमिनीतील ओलावा वेगाने संपत चालला आहे. परिणामी, शेतातील कपाशीची पाने सकाळपासूनच कोमेजू लागली असून अनेक भागांत पिके पार सुकून जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम वाया जाण्याची मोठी भीती व्यक्त होत असून संपूर्ण सोयगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. सोयगाव परिसरात यंदा शेतकऱ्यांनी कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या अनुकूल पावसामुळे पिकांची वाढ अत्यंत जोमदार झाली होती. मात्र, मागील महिनाभरापासून पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांची स्थिती बिकट बनली आहे. कपाशीला फुले व लहान बोंडे लागण्याच्या काळात पुरेसा ओलावा न मिळाल्यास झाडांवरील फुले गळण्याचे आणि बोंडे वाळण्याचे प्रमाण वाढते. उन्हाची तीव्रता जशी वाढत आहे, तशी पिकांची स्थिती अधिक गंभीर होत आहे. कपाशीसोबतच मका पिकाची वाढही पूर्णपणे खुंटली असून, दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास खरिपाच्या उत्पादनात घट अटळ मानली जात आहे. तालुक्यात एकूण ४१,३४५ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून, कपाशी लागवड ३२,८७५ हेक्टर, मका लागवड ६,४३५ हेक्टर, इतर पिके ३,८९७ हेक्टर आहे. तालुक्यातील बळीराजा सध्या आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. सणाच्या आनंदावर विरजण बैलपोळा हा शेतकरी बांधवांसाठी वर्षातील सर्वात उत्साहाचा आणि समाधानाचा सण मानला जातो. वर्षभराच्या कष्टाचे चीज होण्याच्या आशेने शेतकरी हा सण आनंदात साजरा करतात. मात्र, यंदा ऐन सणाच्या तोंडावरच पिके डोळ्यांसमोर वाळू लागल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजन आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह खरिपाच्या पिकांवरच अवलंबून असल्याने, ‘बँकेचे कर्जे आणि खते-बियाणांचा खर्च कसा भागवायचा?’ या चिंतेने शेतकऱ्यांना घेरले आहे. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *