![]()
समाजसेवेची अनेक कामे केली जातात; त्याची चर्चा आणि कौतुकही होते. मात्र कोणतीही अपेक्षा न ठेवता दररोज हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देत त्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा लावण्याचे काम शिक्षक करतात. समाज घडविणाऱ्या या शिक्षकांचा सन्मान करणे हीच खरी कृतज्ञता आहे, असे प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त नगरसेवक योगीराज गाडे यांच्यावतीने आयोजित ४०० शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सतीशचंद सूर्यवंशी, प्रा. शशिकांत गाडे उपस्थित होते. माजी क्रीडाधिकारी अजय पवार, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, सीताराम काकडे, भास्कर जऱ्हाट आदी उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. खासदार लंके म्हणाले, विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना संस्कार, दिशा आणि जीवनाची मूल्ये देत शिक्षक समाज घडवितात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा समाजाचा सन्मान आहे. माजी क्रीडाधिकारी अजय पवार म्हणाले, समाजाचा पायाभूत आधार शिक्षक असतो. मुलाची जडणघडण शाळेत होत असते. विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी केले तर ते विद्यार्थी देशासाठी सक्षम नागरिक बनू शकतात. शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाला सलाम करणारा हा सोहळा ठरला. या उपक्रमाला शिक्षक, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Source link
शिक्षकांचा सन्मान हीच खरी कृतज्ञता- खा. लंके, नगरमध्ये 400 गुरुजनांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान