![]()
तुळशी (ता. माढा, जि. सोलापूर) गावच्या दुष्काळाची कथा अत्यंत वेदनादायी व प्रशासकीय अपयशाचे ज्वलंत उदाहरण आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ६ हजार असून अवघ्या २० किमी अंतरावर उजनी धरण आहे. गावाच्या चारही बाजूंच्या सीमांवर (अरण, वरवडे, परितेवाडी, बेंबळे, मोडनिंब, करकंब) कॅनालचे पाणी तिन्ही पाळीत खळाळत वाहते, तरीही तुळशीकरांच्या नशिबी टंचाई आहे. तलाठी उमेश बनसोडे यांच्या सांगण्यानुसार बेंबळे येथून ग्रामपंचायतीच्या विहिरीत ३० हजार लिटरचे २ आणि वस्त्यांवर १४ हजार लिटरचे २ अशा एकूण ४ टँकरद्वारे रोज १ लाख लिटर पाणी आणून माणसांची व जनावरांची तहान भागवली जात आहे. या हिशेबाने ६ हजार लोकसंख्येला दरडोई केवळ १५ लिटर पाणी मिळते. या भीषण संकटात गावातील ‘जेन झी’ सरसावले आहे. त्यांनी गावातील मारुती मंदिरालाच ‘जंतर-मंतर’चे रूप देत आंदोलनाला डिजिटल व आक्रमक धार दिली आहे. गावात १४ तलाव, ५०० शेततळी व विहिरी आहे. प्रत्येक शिवारात बोअरवेल्स असूनही भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने सर्व स्रोत आटले आहेत. गावाच्या सभोवती कॅनॉलचे पाणी खळाळते तर गावात पाणी मिळत नाही. या अन्यायाविरोधात संतप्त ग्रामस्थांनी अखेर ‘तुळशी गाव विकणे आहे’ असा बोर्डच लावला. हा केवळ निसर्गाचा कोप नसून वर्षानुवर्षे लादलेला ‘राजकीय दुष्काळ’ असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. पाण्यासाठी २ लाख रुपये मोजण्याची तयारी माझी विहीर व शेततळं आटल्याने द्राक्षबाग जळू लागली आहे. जनावरांचा हंबरडा ऐकवत नाही. शेजारच्या करकंब शिवारातून तासाला १ हजार रुपये दराने २०० तासांचे २ लाख रुपये मोजून पाणी आणायची माझी तयारी आहे. पण तिथे ६ तासच वीज असल्याने शेतकरी पाणी द्यायला धजावत नाहीत. -विकास बोचरे, शेतकरी वडिलोपार्जित शेती, शिक्षण तरी लग्न जमेना डिप्लोमाचे शिक्षण आणि वडिलोपार्जित शेती आहे. मुलगी पाहायला पाहुणे येतात, सर्व पसंत पडते; पण उत्पन्नाची हमी नसल्याने आणि पाऊस न पडल्यास बागा उद्ध्वस्त होत असल्याने मुलीचे वडील नकार देतात. – संदीप कुरणे (नाव बदलले) आचारसंहितेनंतर मंत्रालयावर धडकणार! सन २००० पासून तुळशीकर पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. यंदा सिद्धेश्वर सुरवसे, आकाश मोरे, राहुल गव्हाणे, सुहास जाधव, प्रतीक माळी या ‘जेन झी’ तरुणांनी या आंदोलनाला डिजिटल स्वरूप दिले आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासकीय आश्वासनामुळे मारुती मंदिरातील उपोषण तूर्त थांबवले असले, तरी आंदोलन शांत झालेले नाही. पदवीधरची आचारसंहिता संपताच मंत्रालयावर धडकणार, असा इशारा आरएसएस नेते मनोज शहा यांनी दिला आहे. ४३ हजार हजार लिटर दूधसंकलन आले ३० हजारांवर सरपंच डॉ. शरद गोरे यांच्या माहितीनुसार शेतीला पाणी नसल्याने गावात दुग्धव्यवसाय हाच मुख्य आधार आहे. मात्र दुष्काळामुळे १७ डेअरींमधून होणारे ४३ हजार लिटरचे दूध संकलन आता ३० हजार लिटरवर खाली आले आहे. मजुरांचे तांडे रोज पहाटे शेजारच्या समृद्ध गावांत मजुरीसाठी स्थलांतर करत आहेत. ६५० फुटांच्या दोन बोअर कोरड्या गेल्याच आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी ६५० फुटांपर्यंत बोअरवेल्स खोदल्या, परंतु जमीन खडकाळ असल्याने पाण्याचा एक थेंबही लागला नाही. यंदा केवळ ३० मिमी पाऊस झाल्याने शिवारात चारा उरलेला नाही. जनावरांना जगवण्यासाठी शेजारच्या बेंबळे, व्हळे व उजनी भागातून ७ हजार रुपये गुंठ्याप्रमाणे दररोज १३५ टन ऊसाचे वाडे ट्रॅक्टरने आणावे लागत आहेत.
Source link
साेलापूरच्या तुळशी गावात माणसे-जनावरांसाठी फक्त 15 लिटर पाणी:6 हजार लोकसंख्येच्या गावात रोज 1 लाख लिटर पुरवठा