Headlines

पितळखोरा लेणी येथे 27 वा धम्म महोत्सव उत्साहात‎:बौद्ध धम्माचा खरा संदेश म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि मैत्री- डॉ. प्रतिभा अहिरे




ज्यांच्या स्पर्शाचा विटाळ मानला जात होता आणि ज्यांना शूद्रातिशूद्र गणले गेले, अशा सर्व वंचितांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माच्या ओटीत टाकले. अत्यंत विशाल अशा मानवतावादी धम्माशी जोडून त्यांनी या वंचितांना खऱ्या अर्थाने वैश्विक केले. बुद्ध धम्माचा खरा संदेश म्हणजे प्रज्ञा, करुणा अन् मैत्री हा असल्याचे प्रतिपादन विद्रोही कवयित्री डॉ. प्रतिभा अहिरे यांनी केले. धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने आशिया खंडातील सर्वात प्राचीन बुद्धलेणी असलेल्या पितळखोरा येथे गेली २७ वर्षे सातत्याने धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाच्या अंतर्गत धम्म चळवळ आणि आजचे वास्तव या विषयावर डॉ. अहिरे यांचे व्याख्यान पार पडले. या वेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, जयंती आणि उत्सव हे केवळ औपचारिकता किंवा सोपस्कार म्हणून करायचे नसतात. सिंह जसा काही पावले चालल्यानंतर मागे वळून सिंहावलोकन करतो, तसेच आपण सर्वांनी आपल्या चळवळीच्या वाटचालीचे भीमावलोकन केले पाहिजे. बुद्ध होणे म्हणजे प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि विज्ञानवादाचा विचार आत्मसात करून तो प्रत्यक्ष आचरणात आणणे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला विशाल धम्माशी जोडले असून त्याच्याशी आपले प्रामाणिक इमान असणे आवश्यक आहे. या सोहळ्यात भीमराव खिल्लारे, कारभारी खिल्लारे, भास्कर देवरे, राजू खिल्लारे, रतन खिल्लारे, दगडू खिल्लारे व माऊली यांच्या संचाने सादर केलेल्या सुमधुर भीम-बुद्ध गीतांनी उपस्थितांमध्ये नवा उत्साह आणि चैतन्य निर्माण केले. याप्रसंगी कडुबा पवार, अशोक वाहूळ, अमोल सातदिवे, बाबासाहेब वाहूळ, राहुल सातदिवे, नाना शिरसाठ, राजू आवचार, अशोक जाधव, श्रीमती मनोहर, बाबासाहेब वाघ, प्रशांत बनकर, सुरेश निकम, बापू मोरे, राहुल सातदिवे, सतीश धनेधर आणि गौतम जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक अनिल शिरसाट यांनी केले, तर सूत्रसंचालन विनोद अंभोरे यांनी तर आभार अमोल साळवे यांनी मानले. ‘नमो बुद्धाय’ हा मानवतेचा संदेश नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद म्हणाल्या की, नमो बुद्धाय या केवळ घोषणा नसून तो मानवी मूल्यांचा आणि मानवतेचा संदेश आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात संविधान दिले नसते, तर माझ्यासारख्या महिलेला नगराध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली नसती. सुरुवातीला भंते उपाली बोधी यांनी सामुदायिक बुद्धवंदना घेतली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश धनेधर, राजू शेख कमिटी, माणिक आबा पगारे आणि अजय सातदिवे यांची उपस्थिती लाभली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *