![]()
सिल्लोड-भराडी रस्त्यावरील मोढा फाट्याजवळ बुधवारी दुपारी पावणेएक वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची धडक होऊन झालेल्या अपघातात अंभई येथील सुभाष संपत दांडगे (४७) हे जागीच ठार झाले, तर त्यांची पत्नी कांताबाई सुभाष दांडगे (४२) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष दांडगे हे पत्नी कांताबाई यांच्यासह बुधवारी दुपारी १२.५५ वाजेच्या सुमारास सिल्लोड येथून आपल्या दुचाकीने अंभईकडे जात होते. मोढा फाट्याजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या एका दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात दांडगे दांपत्य गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी त्यांना तातडीने प्रथम सिल्लोड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून सुभाष दांडगे यांना दुपारी ३.१० वाजता मृत घोषित केले. कांताबाई यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुभाष दांडगे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता अंभई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद आहे. पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रवीकिरण भारती तपास करत आहेत. नवीन रस्त्यामुळे वाहने सुसाट सिल्लोड-भराडी १५ किलोमीटर रस्त्याचे काही दिवसांपूर्वीच काम झालेले आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने वेगाने चालवण्याचे प्रमाण वाढले. याठिकाणी उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
Source link
मोढा फाट्याजवळ 2दुचाकींची धडक; पतीचा जागीच मृत्यू:पत्नी गंभीर जखमी, सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू