Headlines

हडपसर दारूकांड: शिवसेनेचे पोलीस स्टेशनसमोर तीव्र आंदोलन:अवैध दारू हातभट्ट्यांचे जाळे तातडीने उध्वस्त करण्याची मागणी




पांढरे मळा येथे विषारी हातभट्टी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून हडपसर परिसर अवैध हातभट्टीमुक्त करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने हडपसर पोलीस स्टेशनसमोर तीव्र ठिय्या आंदोलन केले. या विषारी दारूकांडात राहुल क्षिरसागर, विजय शर्मा, अरुण डाडर, अशोक चव्हाण यांच्यासह एकूण पाच नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संपूर्ण हडपसर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गरीब व कष्टकरी नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अवैध धंद्यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. आंदोलनादरम्यान शिवसेनेने आरोप केला की, हडपसरसह पुणे शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. मात्र, या अवैध रॅकेटवर प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या धंद्यामागे कोणाचा राजकीय वरदहस्त आहे आणि कोणते अधिकारी गुंतलेले आहेत, याची सखोल चौकशी करून संपूर्ण रॅकेट उध्वस्त करण्याची मागणी शिवसेनेने केली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. शिवसेनेच्या वतीने या कुटुंबीयांना सर्वतोपरी आर्थिक सहाय्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. भानगिरे यांनी इशारा दिला की, “विषारी दारू पाजून गरीब व कष्टकरी नागरिकांचा जीव घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. हडपसरसह पुणे शहरातील अवैध हातभट्ट्या आणि दारू माफियांचे जाळे तात्काळ उध्वस्त झाले पाहिजे. या रॅकेटला संरक्षण देणाऱ्या संबंधितांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा शिवसेना आणखी तीव्र आंदोलन छेडून रस्त्यावर उतरेल.” भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबवून अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, हडपसर परिसर पूर्णपणे अवैध हातभट्टीमुक्त करावा, तसेच संपूर्ण पुणे शहरात सुरू असलेल्या अवैध गावठी दारू विक्री व हातभट्ट्यांवर तातडीने मोठी कारवाई करावी, या मागण्यांसाठी शिवसेना आगामी काळात अधिक तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *